Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, November 4, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 दुबईत उद्योजकीय भरारी, पण सोलापूरशी नाळ कायम! आयुब खान यांचा १५ वर्षांपासून अखंड सेवायज्ञ

दुबईत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाची यशस्वी वाटचाल; सोलापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली


सोलापूर : - परदेशात जाऊन व्यवसायात यशाचे उत्तुंग शिखर गाठले, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली; मात्र आपल्या जन्मभूमीशी आणि माणसांशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक आयुब खान यांनी आपल्या कर्तृत्वातून ही बाब अधोरेखित केली आहे. व्यावसायिक यशासोबतच गेल्या १५ वर्षांपासून सोलापुरात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी सेवाभावाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


आयुब खान हे गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत वास्तव्यास असून रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 'ग्लोबल इंटरप्रिन्योर कन्सल्टंट्स' (दुबई) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाशी ते जोडलेले आहेत. दुबईसारख्या जागतिक आर्थिक केंद्रात व्यवसायाचा विस्तार करत असतानाच महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.


विशेषतः बेरोजगार, होतकरू आणि व्यवसाय करण्याची जिद्द असलेल्या मराठी तरुणांना दुबईत उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी ते मार्गदर्शन व सहकार्य करतात. परदेशातील व्यावसायिक संधी, उद्योग उभारणी आणि उद्योजकतेचे बारकावे समजावून सांगत मराठी तरुणांनी जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांना परदेशात व्यवसायाच्या नव्या वाटा शोधण्याची प्रेरणा मिळत आहे.





व्यवसायापलीकडे जपला १५ वर्षांचा सेवाधर्म!


आयुब खान यांच्या कार्यातील सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे सोलापूरशी त्यांनी जपलेले घट्ट नाते. गेल्या सलग १५ वर्षांपासून सोलापुरात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि सर्वसामान्यांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


दुबईतील व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या मायभूमीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली दीड दशके सातत्याने सुरू असलेला हा सेवायज्ञ त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतो.


दुबईमध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आयुब खान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश आणि त्याचवेळी सोलापूरच्या मातीशी जपलेली नाळ अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक यश मिळवतानाच समाजासाठीही काहीतरी देणे लागते, ही भावना त्यांनी आपल्या कृतीतून जपली आहे.


या पत्रकार परिषदेला उद्योजक आयुब खान, जगदीश दीड्डी आणि डॉ. पंजाब कत्ते उपस्थित होते.




No comments:

Post a Comment