Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, September 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



शिक्षकच राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार’;

 नॅब शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात

 महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग शिक्षणाधिकारी सुजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.. 


सोलापूर : - शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदान करणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण करणारा खरा शिल्पकार होय, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी तथा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग शिक्षणाधिकारी सुजित शिंदे यांनी केले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), जिल्हा शाखा सोलापूरच्या शिक्षण संकुलातील विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते संस्थेतील शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार डॉ. चंद्रकांत कुलकर्णी होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष अनुगीता पवार, जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार, सहसेक्रेटरी सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार तसेच सन्माननीय सदस्य देवेंद्र भंडारे, बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.



                 यावेळी मनोगत व्यक्त करताना सुजित शिंदे यांनी नॅब संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. समाजातील दुर्लक्षित व दिव्यांग घटकांसाठी संस्था सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. “आज मी शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्कार यांचा मोठा वाटा आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या जीवनातील शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. शिक्षक हा राष्ट्रनिर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक असून, त्याच्यावर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

                  अध्यक्षीय भाषणात डॉ. चंद्रकांत कुलकर्णी यांनी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करताना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात कितीही प्रगती झाली तरी शिक्षकांशिवाय ज्ञानाची खरी प्राप्ती आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण शक्य नाही, असे सांगितले. नॅब संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचे त्यांनी कौतुक केले.

                 प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्ष अनुगीता पवार यांनी प्रास्ताविकातून नॅब संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थेच्या स्थापनेपासून प्रतिवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात असून, हा उपक्रम शिक्षकांमध्ये नवचैतन्य व कार्याची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

         शिक्षकांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात डॉ. बंडोपंत पाटील आणि मेधा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार, राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडचे प्रमुख सौरभ शिंगाडे, चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष माशाळे, स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर, ममता मूकबधिर विद्यालयाच्या प्रमुख संगीता गायकवाड, सुशीलकुमार शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख रामचंद्र कुलकर्णी, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गुंडे, नॅब डेफ-ब्लाइंडचे प्रमुख विशाल शिंदे आदी उपस्थित होते.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जोतिबा काटे यांनी केले, तर आभार देवेंद्र भंडारे यांनी मानले. शिक्षकांच्या सन्मानाने आणि प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमाला उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरण लाभले.




No comments:

Post a Comment