Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, September 1, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



"कॅन्सरची भीती नको, जागरूकता हवी" - सोलापुरात कॅन्सरमुक्त जनजागृती अभियानास प्रारंभ.. 

कॅन्सरवर मात करण्यासाठी सोलापुरात फिनिक्स ग्रुप सरसावला, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची घेतली भेट.. 


सोलापूर : - महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्तनाच्या कॅन्सरच्या प्रमाणाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना सोलापूर शहरात 'कॅन्सरमुक्त सोलापूर' ही संकल्पना राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.


जगात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून भारतातही ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने प्रौढ आणि ज्येष्ठ महिलांमध्ये दिसून येत होता, मात्र आता भारतात वयाच्या २०-२२ वर्षापासूनही हा कॅन्सर दिसू लागला आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.


या पार्श्वभूमीवर सोलापूर कॅन्सर सोसायटीची एक शाखा असलेल्या फिनिक्स ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप ने महिलांमध्ये जनजागृती करण्याचा पुढाकार घेतला आहे. या ग्रुपच्या वतीने महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, "फिनिक्स ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपला द्या तुमची साथ... मिळून सार्‍याजणी करू या, ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वी मात..."


या अभियानांतर्गत ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप, इंडियन कॅन्सर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. सरिता कोठाडिया यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची भेट घेतली.



या भेटीत महिलांमध्ये कॅन्सरविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करणे, कॅन्सरची लक्षणे ओळखणे, नियमित तपासणीचे महत्त्व आणि लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे उपक्रम :

🔹 कॅन्सर जनजागृती व्याख्याने व चर्चासत्रे

🔹 महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबिरे

🔹 स्तनाच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन

🔹 कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखण्याबाबत माहिती

🔹 स्वतःची तपासणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक

🔹 गरजू रुग्णांना योग्य उपचार व्यवस्थेशी जोडण्यासाठी मार्गदर्शन

फिनिक्स ग्रुपच्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट आहे - जागरूकता अभियान, लवकर तपासणीचे महत्त्व पटवून देणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक व मानसिक आधार देणे, समर्थन गट तयार करणे आणि समाजातील प्रत्येक महिलेपर्यंत माहिती व आरोग्य सेवा पोहोचवणे.


सुदैवाने इतर कॅन्सरच्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून पूर्ववत बरे होण्याचे प्रमाण अत्यंत चांगले आहे आणि हाच आशेचा किरण आहे. यासाठी शास्त्रीय आणि प्रतिबंधात्मक माहिती घेणे आणि चिंतामुक्त होणे आवश्यक असल्याचे डॉ. कोठाडिया यांनी सांगितले.


“कॅन्सरची भीती नको, जागरूकता हवी; लवकर निदान आणि योग्य उपचार हाच प्रभावी मार्ग!” या संदेशासह सोलापूर महानगरपालिका आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून शहरातील महिला, युवती आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवला जाणार आहे.


एक तपासणी… एक जागरूकता… एक पाऊल — निरोगी आणि कॅन्सरमुक्त सोलापूरकडे..!




No comments:

Post a Comment