सारा न्यूज नेटवर्क-
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न संघटनेच्या कामशेत शहरअध्यक्षपदी गणेश लालगुडे, उपाध्यक्ष पदी रमेश शिंदे तर सचिवपदी महेंद्र ओव्हाळ..
कामशेत :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न कामशेत शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुसगाव येथील ज्येष्ठ पत्रकार गणेश शिवराम लालगुडे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश मारूती शिंदे एकमताने निवड करण्यात आली. पत्रकारांच्या संघटनात्मक एकजुटीसह कामशेत शहर व परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पत्रकार संघाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
वडगाव मावळ येथे झालेल्या बैठकीत पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ नेते पत्रकार विजय सुराणा आणि मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर यांनी गणेश लालगुडे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी व रमेश शिंदे उपाध्यक्ष पदासाठी घोषणा केली. उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी दिल्यानंतर निवड जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत जेष्ठ पत्रकार गणेश लालगुडे अध्यक्ष,सारा न्यूजचे प्रतिनिधी रमेश शिंदे यांची उपाध्यक्षपदी, तर जागृत मावळचे संपादक महेंद्र ओव्हाळ यांची सचिवपदी निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सलीम शेख, सचिन मोरे, संजय गायकवाड, विलास गायकवाड, सारिका लालगुडे आणि मंथन मोरे यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एस. एम. जोशी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन पदाधिका-यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी संघटितपणे काम करून पत्रकारिता अधिक सक्षम करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे विश्वस्त शरद पाबळे, मावळ तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्ष रेखा भेगडे, सचिव महादेव वाघमारे, पत्रकार परिषद प्रमुख सुभाष भांडे, प्रकल्प प्रमुख दत्ता म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते, पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडताना पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर कामशेत शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून स्थानिक पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश लालगुडे यांच्या नेतृत्वाखाली कामशेत शहर पत्रकार संघ अधिक मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ, युवा आणि महिला पत्रकारांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याची भूमिका संघाकडून घेण्यात येणार आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. कामशेत शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला,





No comments:
Post a Comment