सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर-विजापूर महामार्गावर मंद्रुप पोलिसांची मोठी कारवाई:
२३ लाखांच्या मुद्देमालासह कर्नाटकातील गुटखा तस्कर जेरबंद;
'मकोका' अंतर्गत कारवाईची मागणी
प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर
सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदणी टोलनाक्याजवळ मंद्रुप पोलिसांनी गुरुवारी पहाटे ६ वाजता एक मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा तब्बल ६ लाख ९३ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत गुटख्यासह १६ लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची झायलो गाडी असा एकूण २२ लाख ९३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना पहाटेच्या सुमारास कर्नाटकातून एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदणी टोलनाक्याजवळ सापळा रचला.
पहाटे ६ च्या सुमारास संशयास्पद पांढऱ्या रंगाची झायलो गाडी टोलनाक्याजवळ आली असता, पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. गाडीत पांढऱ्या रंगाची पोती मिळून आली, ज्यामध्ये बंदी असलेला गुटखा लपवला होता.
पोलिसांनी गाडीचालक नारायण अर्जुन हुगार (वय २६, रा. पडनूर, ता. इंडी, जि. विजापूर) याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.
अन्न व औषध प्रशासनाकडून पंचनामा:
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रामानंद स्वामी यांनी जप्त केलेल्या साठ्याची तपासणी केली. यात विमल पानमसाला, गोवा गुटखा, आरएमडी, बाबा आणि रजनीगंधा या नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित साठा आढळून आला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रामानंद स्वामी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक नारायण हुगार आणि गुटख्याचा मुख्य पुरवठादार परमेश्वर बालगाव (रा. पडनूर, जि. विजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा तस्करीचे रॅकेट आणि त्याचे आर्थिक लागेबांधे लक्षात घेता, या गुन्ह्यातील मुख्य उत्पादक, पुरवठादार आणि आर्थिक लाभ घेणाऱ्या सर्व संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (MCOCA - मकोका) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे करत आहेत.


No comments:
Post a Comment