सारा न्यूज नेटवर्क -
दुष्काळाच्या झळांमध्ये माणुसकीचा उजेड.!
बहुरूपी नगरसह सोलापूर शहर व ग्रामीण भागात दिवाळी शिधा किटचे वाटप;
एम.के.फाउंडेशन यांचा सामाजिक उपक्रम!
सोलापूर (प्रतिनिधी) : - दक्षिण सोलापूर
दुष्काळामुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला असताना, गरजूंच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी एम. के. फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. सणासुदीच्या काळात कोणत्याही कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये, या भावनेतून फाउंडेशनच्या वतीने बहुरूपी नगर, विजापूर रोड येथे गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणीही या उपक्रमांतर्गत मदतीचा हात देण्यात आला.
एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बहुरूपी नगरमधील मल्लेश सूर्यवंशी, बसवराज सितारे, सुभाष सितारे, कल्लाप्पा तेले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनीही उपक्रमात सहभाग घेतला.
दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा आनंदाचा सण साजरा करताना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी शिधा किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, मदत देताना लाभार्थ्यांचा स्वाभिमान आणि सन्मान जपण्याची भूमिका फाउंडेशनने घेतली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे म्हणाले की, समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे. केवळ सणाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा गरजूंच्या घरात आनंद निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणे महत्त्वाचे आहे.
याच सामाजिक भावनेतून एम. के. फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत गरजू कुटुंबांसाठी दिलासा ठरला असून, समाजातील इतर घटकांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा ठरत आहे...



No comments:
Post a Comment