Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 22, 2025

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

अशास्त्रीय गतिरोधकां मुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरांमध्ये चुकीच्या अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक केल्यामुळे अनेक नागरिकांच्या यापूर्वी अपघात होऊन मृत्यू झालेला असून काल रात्री अंत्रोळीकर  नगर नगर मध्ये एका युवकाचा अशास्त्रीय गतिरोधकामुळे अपघात होऊन मृत्यू झाला असून सोलापुरातील अशा आशास्त्रीय गतिरोधक तयार करून मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे. 


एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले, की नागरिकांची मागणी म्हणून तेथे गतिरोधक बसविण्याचा उपाय केला जातो. या तात्पुरत्या उपायामुळे नागरिकांचा रोष कमी होत असला, तरी अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकाचे दीर्घकालीन तोटे लक्षात घेतले जात नाहीत. सोलापूर शहरात विविध प्रकारचे गतिरोधक पाहिले तर ते नेमके कसे असावेत, यासंबंधी प्रशासन यंत्रणांत समन्वय नसल्याचेच दिसून येते. या विरोधात काही सामाजिक संस्था आवाज उठ‌वत असल्या, तरी त्यांची फारशी दखल घेतली जात नाही.


मोठमोठे उंचवटे तयार करून केलेले गतिरोधक, छोट्या उंचीच्या सलग डांबरी पट्ट्या टाकून तयार केलेले आणि रबरी गतिरोधक अशा प्रकारचे गतिरोधक सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर आढळून येतात. यातील नेमक्या कोणत्या प्रकारचे गतिरोधक कोठे आवश्यक आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. नागरिकांची मागणी आणि नगरसेवक, नेत्यांचा रेटा असला की कशाही पद्धतीने गतिरोधक रात्रीतून बसविण्याची किमया सोलापूर शहरात झालेली दिसून येते. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही हतबल झाली की काय, असा प्रश्न पडतो.


शहरात गर्दीच्या ठिकाणी, शहरातून जाणाऱ्या महामार्गावर, शाळा, सरकारी कार्यालये, महत्त्वाचे रस्ते, वळणाच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. अपघात टाळण्यासाठी शहरांतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत; परंतु आता शहरात अपघात रोखण्यासाठी टाकण्यात आलेले हेच गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.  गतिरोधकावरून पडून अनेक जणांचा मृत्यू सुद्धा झालेला  आहे तसेच अनेक नागरिक गतिरोधकामुळे व शहरातील मोठ मोठ्या खड्ड्यामुळे आजारांनी त्रस्त असून मान, पाठ, मणक्याचे गंभीर आजार होत चालले आहेत. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे. यातील अनेक गतिरोधक नियमबाह्य आहेत. यासंबंधी आखून दिलेल्या धोरणाची पायमल्ली करत हे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यावर टाकण्यात आलेले बरेच गतिरोधक मोठे व चुकीच्या पद्धतीचे असल्याने त्याचा त्रास थेट वाहनचालकांच्या शरीरावर होत आहे. या गतिरोधकांमुळे अनेक वाहनचालकांना मान, पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. गतिरोधक कमी म्हणून की सोलापुरात खड्ड्यांचाही त्रास सहन करावा लागतो. रस्ता खोदून त्या खालून पाइपलाइन अगर केबल टाकल्यानंतर खोदकाम व्यवस्थित बुजविले जात नाही. असे कितीतरी चर रस्त्यांवर वर्षानुवर्षे आहेत. गतिरोधकांपेक्षाही त्यांचा त्रास जास्त आहे.


चुकीच्या आणि बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे वाहने खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठी वाहने स्पीडब्रेकरवर जोरात आदळल्याने छोट्या कारच्या इंजिनला त्याचा झटका बसतो. या कारणामुळे काही वाहनांना थेट गॅरेजमध्ये न्यावे लागते. स्वत:च्या आरोग्यासोबत वाहनांच्या दुरूस्तीचाही भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.




गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी, याबाबत निकष ठरवले गेले आहेत. गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचना फलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतिरोधक उभारताना या गतिरोधकांची उंची अडीच ते दहा सेंटिमीटरपर्यंत, लांबी ३.५ सेंटिमीटर, वर्तुळकार क्षेत्र १७ मीटर असायला हवे अशा शास्त्रोक्त पद्धतीचे नियमानुसार गतिरोधक करावेत अन्यथा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती ब्रिगेडचे वतीने देण्यात आला आहे.

यावेळी छत्रपती ब्रिगेड संस्थापक शाम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा कार्याध्यक्ष गजानन शिंदे महिला कार्याध्यक्ष सोनाली सगर जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शेखर कंटेकर सतीश वावरे आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment