सारा न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालय, सोलापूर येथे नव्याने सुरू झालेल्या दंतचिकित्सा विभागाचा शुभारंभ..
सोलापूर, दि. ७ ऑगस्ट : - महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालय, सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंतचिकित्सा विभागाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व्हर्च्युअल (Virtual) माध्यमातून संपन्न झाला. यावेळी सोलापूर येथील रुग्णालयात प्रमुख उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या शुभहस्ते फीत कापून दंतचिकित्सा विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाळूजकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी आर. पी. भोसले, कार्यालय अधीक्षक अमोल साळुंखे, डॉ. युगंधरा देसुरकर, डॉ. राजेश फडकुले, डॉ. आसावरी कुलकर्णी, डॉ. प्रसाद नंदिमठ तसेच रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांची माहिती घेतली.
यानंतर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आधुनिक वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, कामगार विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नवीन दंतचिकित्सा विभाग सुरू झाल्यामुळे सोलापूर व परिसरातील कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य नागरिकांना दंत आरोग्याच्या अधिक दर्जेदार, आधुनिक व सुलभ सेवा उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


No comments:
Post a Comment