सारा न्यूज नेटवर्क -
रोटरी सोलापूर COPS परिवारातर्फे "भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम" उत्साहात संपन्न
सोलापूर, दि. ७ ऑगस्ट : - रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत रोटरी सोलापूर COPS परिवार यांच्या वतीने केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) व भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा (ACB), पुणे यांच्या सहकार्याने "भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम" उत्साहात संपन्न झाला. समाजात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती निर्माण करून नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया व त्यांच्या अधिकारांची माहिती देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका पोलीस निरीक्षक सौ. पल्लवी कुलकर्णी (CBI-ACB, पुणे) यांनी CBI म्हणजे काय, CBI ची स्थापना, विविध शाखा, कार्यपद्धती, तपासाची प्रक्रिया, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदे, CBI हेल्पलाईन, ऑनलाइन व ऑफलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कोणती भूमिका घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून निर्भयपणे तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी CBI-ACB, पुणे येथील श्री. अमोल अरसुले यांनी प्रत्यक्ष घडलेल्या प्रकरणांच्या उदाहरणांद्वारे गुन्ह्यांचा तपास, पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया, आधुनिक तपास तंत्रज्ञानाचा वापर तसेच तपासातील विविध टप्प्यांची माहिती प्रभावीपणे मांडली. त्यांच्या संवादात्मक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रोटे. जयेश पटेल, रोटरी सोलापूर COPS परिवाराचे अध्यक्ष रोटे. मितेश पंचमिया, सचिव रोटे. किरणकुमार मुसळे, तसेच रोटरी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सोलापूर शहरातील विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव, रोटेरियन्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. मितेश पंचमिया यांनी करून या जनजागृती अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या शेवटी रोटेरियन ज्ञानेश्वर जाधव यांनी उपस्थित मान्यवर, CBI-ACB अधिकारी, रोटरी पदाधिकारी तसेच उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी व समाजोपयोगी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




No comments:
Post a Comment