Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, August 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 


आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाची सोलापुरात सुरुवात.. 

सर्वोपचार रुग्णालयात जनजागृतीसह माता-बालकांना साहित्य वाटप.


 सोलापूर (प्रतिनिधी) :- परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने बाह्यरुग्ण विभागात जनजागृती कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन, रोल-प्ले आणि माता-बालकांना साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात परिचारिकांच्या आद्यदेवता फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.


अध्यक्षीय भाषणात डॉ. जयकर यांनी स्तनपान ही केवळ मातेची जबाबदारी नसून प्रत्येक मातेला आवश्यक आधार, प्रोत्साहन आणि योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही आरोग्य यंत्रणा व समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षकवृंद आणि प्रशिक्षणार्थींच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

बालरोग विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांनी स्तनपान हे नवजात बालकासाठी सर्वोत्तम आणि संपूर्ण पोषण असल्याचे सांगितले. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान देणे तसेच अनावश्यक फॉर्म्युला फीडिंग टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी परिचारिका प्रशिक्षणार्थींनी बाह्यरुग्ण विभागात माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन भरविले. तसेच प्रसूतीपश्चात कक्षात रोल-प्लेच्या माध्यमातून योग्य स्तनपान तंत्र, मातेचा आहार, स्तनपानाचे फायदे, गैरसमजांचे निरसन आणि माता-बालकांच्या आरोग्याविषयी उपस्थित माता व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रभावी जनजागृती केली.


कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, बालरोग विभागप्रमुख डॉ. सुधीर सरवदे, अधिसेविका श्रीमती कविता ढगे, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा शिंदे, शिक्षकवृंद, अधिपरिचारिका, परिसेविका, प्रसूतीपश्चात माता व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवजात बालकांना कपडे तसेच मातांना खाऊचे वाटप करण्यात आले. सुरक्षित मातृत्व, माता-बाल संगोपन आणि कुटुंब-केंद्रित आरोग्यसेवेप्रती संस्थेची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. मनीषा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षकवृंद व प्रशिक्षणार्थींनी केले.




No comments:

Post a Comment