Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, August 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 




सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई - बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश


निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक, सिव्हील मधील 2 वरिष्ठ लिपिकांचाही समावेश


सोलापूर, दि. 04/07/2026 :- सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकारी, सिव्हील हॉस्पिटलच्या दोन वरिष्ठ लिपिकांसह एकूण 08 जणांना अटक करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय?


छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. 554/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(3), 338, 340(2),233, 235, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव, रा. अहिल्यानगर याने कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्यासाठी सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधारकार्ड बनवून दि. 11/05/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले होते.


या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता.



तांत्रिक तपासातून रॅकेट उघडकीस


तपास अधिकारी यांनी तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपी राजेश जाधव याचा शोध घेऊन त्यास गाव- करंदी ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याच्या कृत्यात सहभागी असलेल्या सर्व 8 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.


अटक केलेले आरोपी -

1. राजेश भाऊसाहेब जाधव, वय 38, रा. हुडको, नळेगाव, अहिल्यानगर - नोकरी कनिष्ठ लिपिक 2. महेश दिनकर बारगजे, वय 52, रा. अनंततीर्थ कॉलनी, बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 3. राजेश रमाकांत ढवण, वय 58, सेवानिवृत्त लॅब असिस्टंट, सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर 4. विजय बाबासाहेब गर्जे, वय 48, प्राथमिक शिक्षक, पाथर्डी, अहिल्यानगर 5. अरुण रामदास शिंपी, वय 70, सेवानिवृत्त (बाटा कंपनीत सेल्समन), रा. नाशिक 6. वसीम शौकत खान, वय 42, वरिष्ठ लिपिक, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर, रा. गजानन नगर, होटगी रोड, सोलापूर 7. सागर गोविंद राजपूत, वय 42, वरिष्ठ लिपिक, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर, रा. वसंतनगर, विजापूर रोड, सोलापूर 8. सतीश भाऊराव कनके, वय 31, निवासी वैद्यकीय अधिकारी, सध्या जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर, मूळ रा. किनवट, जि. नांदेड. 

सिव्हीलमधील 3714 प्रमाणपत्रांची तपासणी


तपासादरम्यान आरोपी क्र. 1 चे बनावट आधारकार्ड कोठे तयार केले याबाबत तपास करून संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठी वापरलेले सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथील संगणकही जप्त करण्यात आला आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथून दि. 01/01/2025 ते 31/06/2026 पर्यंत एकूण 3714 प्रमाणपत्रे दिल्याचे व त्यापैकी 08 प्रमाणपत्रे ही तज्ञांची तपासणी न होताच वितरित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास चालू आहे.


आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल


आरोपींचे कोर्ट चेकर अॅप व आयसीजेएस प्रणालीवर पूर्व अभिलेख पडताळले असता -

• महेश बारगजे वर अहिल्यानगर मध्ये 420, 471 सह 3 गुन्हे • राजेश ढवण वर कोतवाली ठाण्यात 302, 201 सह गुन्हा • विजय गर्जे वर पाथर्डी ठाण्यात 324, 354, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. 

या पथकाने केली कारवाई


ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर, भरत चंदनशिव व त्यांचे पथक - विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, अंकुश मोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धिरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.




No comments:

Post a Comment