सारा न्यूज नेटवर्क -
एमआर लिनॅकमुळे कर्करोग उपचार अधिक अचूक, सुरक्षित : डॉ. भरत कुमार
कर्करोगावरील रेडिएशन उपचारात एमआर लिनॅक तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण
सोलापूर : - कर्करोगावरील रेडिएशन उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक करण्यासाठी एमआर लिनॅक तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून, रेडिएशन उपचारांच्या क्षेत्रात यामुळे नव्या युगाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती यशोदा हॉस्पिटल्स, हायटेक सिटी, हैदराबाद येथील रेडिएशन ऑन्कोलॉजीचे सल्लागार डॉ. भरत कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआर लिनॅक प्रणालीमध्ये एमआरआय आणि लिनियर एक्सीलेटर या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा एकाच यंत्रणेत समावेश आहे. प्रत्येक उपचार सत्रापूर्वी ‘अॅडॉप्टिव्ह एमआरआय स्कॅन’ केल्यामुळे त्या दिवशी ट्यूमरचा आकार, रचना व स्थान अचूकपणे समजते. त्यानुसार उपचारात आवश्यक बदल करून प्रामुख्याने बाधित भागावरच रेडिएशन देणे शक्य होते. त्यामुळे आजूबाजूच्या निरोगी अवयवांवरील परिणाम कमी करण्यास मदत होते. हायटेक सिटी हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सने चार वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान भारतात प्रथम उपलब्ध केले आहे. रुग्णांवर यशस्वी उपचार करून उल्लेखनीय यश मिळवले आहे, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
प्रोस्टेट, रेक्टल, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख, मूत्राशय, फुफ्फुस, स्वादुपिंड तसेच ब्रेन ट्यूमर यांसारख्या गुंतागुंतीच्या कर्करोगांमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. विशेषतः ब्रेन ट्यूमरमध्ये एमआरआयच्या मार्गदर्शनामुळे मिलीमीटरच्या अचूकतेने उपचार करणे शक्य होते.
काही निवडक प्रकरणांमध्ये उपचार केवळ पाच दिवसांत पूर्ण करता येतात. पारंपारिक रेडिएशन थेरपीमध्ये रुग्णांना डोकेदुखी, त्वचेची जळजळ, थकवा, मळमळ किंवा लघवी व विष्ठेवाटे रक्त येणे यांसारख्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. परंतु, एमआर लिनॅक तंत्रज्ञानामुळे हे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात.
या पत्रकार परिषदेला अतुल चव्हाण, श्रीकांत पत्तीपागा, पवन कुलकर्णी, आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment