सारा न्यूज नेटवर्क -
कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे उत्साहात उद्घाटन
सोलापूर, दि. ३ ऑक्टोबर : श्री. ऐ. प. जैन पाठशाळा संचलित, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर येथे बी.एड. द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रांतर्गत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन बोंदाडे होते. मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन हेडे, डॉ. दत्ता वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक शिवशरण यांनी केलेल्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
मराठी भाषेचे ऐतिहासिक वैभव, समृद्ध साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच भावी शिक्षकांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान आणि संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमात सागर पाटील, प्राजक्ता तुळजापुरे आणि ओंकार भांजे यांनी विद्यार्थी मनोगते व्यक्त केली. पंचम देशपांडे, सौंदर्या जगदाने, सौरभ व्यवहारे, विद्या जमदाडे आणि भाग्यश्री स्वामी यांनी काव्यवाचन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सौंदर्या जगदाने यांनी ‘मजेदार खेळ’ या उपक्रमातून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अश्विन बोंदाडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करून तिच्या जतन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अंकुर चाबुकस्वार यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीगौरी अवसेकर यांनी केले. विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरवशाली वारसा जपण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.


No comments:
Post a Comment