Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, October 9, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर ब्रेकिंग - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दांडिया गरबा २०२६ रद्द, संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

लाडक्या बहिणींनो माफ करा! सोलापुरात यंदा गरबा नाही, तुमच्या भावाने निधी शेतकऱ्यांना दिला - प्रकाश राठोड

सोलापूर : - सोलापूर जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट असल्याने शिवसेनेने मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा 'शिवसेना दांडिया गरबा २०२६' हा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे.


या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश राठोड यांनी आपल्या लाडक्या बहिणींना उद्देशून एक भावनिक आवाहन केले आहे.

"हे कळवताना मनाला अतिशय वेदना होत आहेत की, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात खूप मोठा दुष्काळ पडला आहे. मी स्वतः शेतकरी असल्याने या दुष्काळाची मोठी झळ शेतकरी बांधवांना, त्यांच्या जनावरांना आणि पिकांना बसणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे," असे प्रकाश राठोड यांनी म्हटले आहे.

गरब्याचा निधी थेट बळीराजाला


या गंभीर परिस्थितीचा विचार करून कमिटीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


१. गरबा रद्द: यावर्षीचा दांडिया गरबा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

२. संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांना: या गरब्यासाठी जमा झालेला आणि लागणारा संपूर्ण निधी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे.


शिवसेना शेतकरी मदत कक्ष सुरू होणार


केवळ निधी देऊन न थांबता, लवकरच 'शिवसेना शेतकरी मदत कक्ष' सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाद्वारे -

• शेतकऱ्यांना आर्थिक मदत • जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था • पीक विमा व शासकीय अनुदान मिळाले की नाही याची पाहणी • गरजू शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर मदत पोहोचवणे 

असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.


"माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, हा फक्त गरब्याचा कार्यक्रम रद्द नाही, तर आपल्या बळीराजाच्या अश्रू पुसण्याचा छोटासा प्रयत्न आहे. दुष्काळाशी आपण मिळून दोन हात करूया. पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस चांगला होईल, शेतं हिरवीगार होतील, तेव्हा आपण दुप्पट उत्साहात गरबा खेळूया," असे आवाहन तुमचा लाडका भाऊ प्रकाश राठोड यांनी केले आहे.


प्रकाश राठोड यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहण्याचा हा निर्णय सोलापूरकरांच्या मनाला भिडला आहे.




No comments:

Post a Comment