सारा न्यूज नेटवर्क -
कृ.भि. आंत्रोळीकर सोलापूरकरांचे अभिमान..!
आंत्रोळी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले अर्धपुतळ्याचे अनावरण..
...
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृ.भि. आंत्रोळीकर सोलापूरचे भूषण होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते. सोलापूरांना त्यांचा अभिमान आहे, असे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
आंत्रोळी येथे गावचे सुपुत्र देशभक्त स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृ.भि. आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे शहाजी पवार, नगरसेविका रोहिणी तडवळकर, जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते, पंचायत समिती सदस्या प्रियांका रमेश आसबे, मोहन अंत्रोळीकर, आनंदकुमार अंत्रोळीकर, सरपंच माया सलगरे, उपसरपंच सोनाली खरात व अंत्रोळीकर परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डॉ. आंत्रोळीकर हे केवळ अंत्रोळी गावचेच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान होते. त्यांच्या कार्याची नोंद भारताच्या इतिहासात झाली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्या काळातील एमबीबीएस पदवीधर असलेले डॉ. आंत्रोळीकर उच्चशिक्षित व उच्च विचारांचे होते. सर्वसामान्य व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले डॉ. अंत्रोळीकर आपल्या जिल्ह्याला लाभले याचा अभिमान वाटतो.
सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी कुर्बान हुसेन हे त्यांचे शिष्य होते, तर उर्वरित हुतात्मे त्यांचे मित्र होते. डॉ. अंत्रोळीकर यांच्या कार्याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला व्हावा. अंत्रोळी गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण काम करूया.
डॉ. अंत्रोळीकर स्मृती न्यासाचे अध्यक्ष श्रीकांत येळेगावकर यांनी प्रस्ताविकात डॉ. अंत्रोळीकर यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस साने गुरुजी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व लोकनृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.
खासदारांची हजेरी तर आमदारांची गैरहजेरी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी डॉ. अंत्रोळीकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मात्र कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खासदार प्रणिती शिंदे या पालकमंत्री येण्यापूर्वीच आल्या व पुतळ्याला अभिवादन करून निघून गेल्या. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रिकेत नाव असलेले तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख आलेच नाहीत. पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे हे सुद्धा गैरहजर राहिले. भाजपचे पालकमंत्री मतदारसंघात आले असताना आमदार देशमुख यांच्या गैरहजेरीची कार्यक्रमानंतर चर्चा रंगली होती.



No comments:
Post a Comment