Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, July 8, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 'ऑपरेशन हायवे': मिरची पावडर टोळीचा पर्दाफाश, मरक्या- मंड्या- इंडिया जेरबंद..

सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई: क्रेटा कार आडवून लुटणाऱ्या ३ आरोपींना अटक 3


सोलापूर, ७ जुलै २०२६ :- सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २७ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, चाकू, मिरची पावडर, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि क्रेटा कारची चावी असा एकूण ४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

दिनांक २ जुलै २०२६ रोजी फिर्यादी मल्लिकार्जुन कोणे व त्यांचे मित्र शांतकुमार येडवे हे कर्नाटकातील विजापूरहून लग्न समारंभ आटोपून क्रेटा गाडीने निघाले होते. विजापूर रोडवरील न्यू अंबर हॉटेलजवळ त्यांची गाडी रिक्षाने आडवण्यात आली. रिक्षातील तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून बोटातील ३ सोन्याच्या अंगठ्या व गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई

पोलीस आयुक्त एम. राज कुमार व डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दिनांक ७ जुलै रोजी स.पो.नि. शंकर धायगुडे व भरत चंदनशिव यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी विजापूर नाका कंबर तलाव येथील झाशीची राणी पुतळ्याजवळ सोने विक्रीसाठी आले आहेत. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.



अटक आरोपींची नावे 

1. शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव, वय ३४ वर्षे 

 2. महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव, वय २५ वर्षे  

3. अमित ऊर्फ इंडिया हरीशचंद्र पवार, वय ३३ वर्षे  सर्व राहणार - प्रताप नगर तांडा, विजापूर रोड, सोलापूर.


झडतीमध्ये आरोपींकडून चोरीच्या ३ अंगठ्या, चाकू, मिरची पावडर व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा क्र. MH-13 CT-9269 जप्त करण्यात आली. मुख्य आरोपी शिवाजी जाधववर विजापूर नाका व मंद्रूप पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, सहायक आयुक्त दिलीप पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




No comments:

Post a Comment