सारा न्यूज नेटवर्क -
शिक्षकांच्या SIR अभियान नियुक्त्या रद्द करा;
मुख्याध्यापक संघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
सोलापूर, 6 जुलै : - विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण (SIR) अभियानासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात केलेली नियुक्ती रद्द करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, या मागणीसाठी सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने सोमवारी उप जिल्हाधिकारी महसूल यांना निवेदन दिले. यावेळी शहरातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनातील मुख्य मुद्दे:
सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, उत्तर सोलापूर यांना हे निवेदन सादर करण्यात आले. संघाचे म्हणणे आहे की, SIR अभियानासाठी सोलापूर शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जवळपास सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक मूल्यमापन, अभ्यासक्रम नियोजन, प्रयोगशाळा, ग्रंथालय, परीक्षा नियोजन यांसारखी महत्त्वाची कामे सुरू असताना शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्त केल्यास विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती संघाने व्यक्त केली.
कायदा आणि संविधानाचा दाखला:
निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम 21-अ आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 (RTE Act) चा उल्लेख करण्यात आला. कलम 27 नुसार शिक्षकांना निवडणूक, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापन वगळता इतर अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करू नये, अशी तरतूद असल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले.
उपस्थित मान्यवर:
यावेळी सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव विद्यानंद स्वामी, विद्या सचिव डॉ. श्रीपाद सुरवसे, जिल्हा प्रतिनिधी रविशंकर कुंभार, जिल्हा सचिव श्रीशैल पाटील, खजिनदार ईस्माईल शेख, चंद्रकांत माळी, कार्तिक चव्हाण, यलगुंडे सर, जिल्हा विद्या सचिव विष्णू मस्के, जिवाची पटेल, पाटील सर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघाने प्रशासनाकडे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी नियुक्त न करता पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.



No comments:
Post a Comment