सारा न्यूज नेटवर्क -
दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांचा मुंबईत गौरव :
राज्यपाल व कृषीमंत्री यांच्या हस्ते "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार" प्रदान
प्रगतिशील शेतकरी शिवानंद शिंगडगाव आणि युवा शेतकरी गंगाधर बिराजदार व प्रणव बिराजदार यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार" प्रदान..
प्रतिनिधी( दक्षिण सोलापूर ) :-
शेती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत दक्षिण सोलापूर तालुक्याने पुन्हा एकदा राज्यस्तरावर आपला ठसा उमटवला आहे. मंद्रुप येथील प्रगतिशील शेतकरी शिवानंद शिंगडगाव आणि निंबर्गी येथील युवा शेतकरी गंगाधर बिराजदार व प्रणव बिराजदार यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात राज्यपाल विष्णुदेव शर्मा व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरितक्रांतीच्या प्रणेतेपदी मानाचा सन्मान
माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार राज्यातील प्रगतिशील व शेतीनिष्ठ शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. जलव्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धित शेती, शेतकरी संघटन आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून दरवर्षी निवडक शेतकऱ्यांना गौरवण्यात येते.
दक्षिण सोलापूरसाठी अभिमानाचा क्षण
शिवानंद शिंगडगाव यांनी मंद्रुप परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले शेतीतील प्रयोग, तर गंगाधर व प्रणव बिराजदार यांनी निंबर्गी येथे राबवलेले सेंद्रिय शेती व जलसंधारणाचे मॉडेल राज्यभरासाठी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने तिघांचाही पुरस्कार देऊन गौरव केला.
पुरस्कार जाहीर होताच दक्षिण सोलापूर तालुक्यातून तिघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे तालुक्यातील युवा शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



No comments:
Post a Comment