Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, November 18, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मांजरीतील गोपाळपट्टीत रेल्वेची भीषण धडक; 

तीन तरुणांचा मृत्यू, दोघे थोडक्यात बचावले. 


पुणे (प्रतिनिधी) : - मांजरी हद्दीतील गोपाळपट्टी परिसरात रविवारी (ता. १६) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले दोघेजण अवघ्या काही क्षणांच्या फरकाने बचावले. पुणे-दौंड डेमू रेल्वेने हे तिघे तरुण रुळांवर असताना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे; मात्र अपघाताचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत प्रथमेश नितीन तिंडे (वय १८, रा. काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (वय १८, रा. विशाल कॉलनी, ढेरे बंगला, गोपाळपट्टी) आणि तुषार शिंदे (वय १९, रा. गोपाळपट्टी, हडपसर) यांचा मृत्यू झाला. सर्व तरुणांवर प्रेम करणाऱ्या परिसरात या दुर्घटनेने शोककळा पसरली असून स्थानिकांनी या मृत्यूंवर हळहळ व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पुणे-दौंड डेमू पुण्याहून दौंडकडे जात होती. याच वेळी मृत्युमुखी पडलेले तिघे आणि त्यांचे आणखी दोघे मित्र असे पाच जण गोपाळपट्टीतील रेल्वे रुळांवर एकत्र आले होते. रेल्वे वेगाने येत असल्याचे त्यांना कदाचित लक्षात आले नसावे. भरधाव गाडीने तिघांना जोराची धडक दिली आणि ते जागीच ठार झाले. धडक होताच इतर दोघेजण घाबरून घटनास्थळावरून पळून गेले. अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलिस आणि लोहमार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रभर पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविले. घटनेचे कारण आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असून जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणीही सुरू आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघात नेमका कसा घडला, तरुण रुळांवर का आले होते आणि त्या वेळी त्यांच्या सोबत असलेले इतर दोघेजण काय माहिती देतात, याचा तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment