Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, November 2, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 चोखोबांच्या साहित्यात समतेची ममता भेटते – डॉ. रघुनाथ कुचिक

संत नामदेव–चोखामेळा नात्याचे दर्शन घडविणारे तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन नरसी येथे २९ व ३० नोव्हेंबरला.. 


पुणे (प्रतिनिधी) :- संत शिरोमणी नामदेव महाराज जयंतीनिमित्त वृंदावन फाउंडेशन, संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव (जि. हिंगोली) यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन–२०२५ च्या पोस्टर अनावरण कार्यक्रमाचे आयोजन प्राईड हॉटेल, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि कामगार सेना प्रदेश सरचिटणीस मा. डॉ. रघुनाथ कुचिक तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ‘संत नामदेव आणि संत चोखामेळा सार्थ अभंग गाथा’ या ग्रंथाचे संपादक व पुणे विद्यापीठाचे माजी प्राध्यापक प्रा. डॉ. ओमश्रीश दत्तोपासक यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टरचे अनावरण संपन्न झाले.




यावर्षीचे तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन हे हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थान नरसी येथे दिनांक २९ आणि ३० नोव्हेंबर २०२५ (शनिवार–रविवार) रोजी आयोजित करण्यात आले असून, या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे नव्या पिढीतील अभ्यासक प्रा. डॉ. विठ्ठल खं. जायभाये असतील.


या संमेलनात संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्या गुरु–शिष्य नात्याचे प्रगल्भ दर्शन घडणार असल्याचे मत डॉ. ओमश्रीश दत्तोपासक यांनी व्यक्त केले.

“संत चोखोबा व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे साहित्य हे वर्तमान काळात समता–ममतेचे विचार फुलविणारे आहे,” असे प्रतिपादन डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केले.


तेराव्या शतकात संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत सावता माळी, संत गोरोबा, संत जनाबाई आणि संत चोखोबा या संतांनी अभंग व कीर्तनाद्वारे समाजजागृती घडवली. त्या संत परंपरेतील संत चोखोबा हे अत्यंत महत्त्वाचे नाव असल्याचे मत संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक श्री. सचिन पाटील यांनी मांडले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामदास चवरे होते.

प्रा. भाऊराव खुणे, महादेवराव ढेंबरे, बाळासाहेब पानसरे, ऍड. बाबूराव हंद्राळे तसेच संत साहित्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सांगता संत नामदेव महाराजांच्या “अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा” या अभंग पसायदानाने झाली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment