सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर शहर सायबर पोलीसांची मोठी कामगिरी;
क्रिप्टो ट्रेडिंगच्या आमिषाने ७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय सूत्रधार वर्षभरानंतर अटक
सोलापूर : - सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीला सुमारे एक वर्षानंतर अटक करण्यात सोलापूर शहर सायबर पोलीसांना यश आले आहे. सदर आरोपी परदेशात (नेपाळ) राहून तेथील चिनी व नेपाळी साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत होता. त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसच्या आधारे त्याला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली.
सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ०४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (C) व ६६ (D) नुसार दि. १६ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींकडून ऑनलाईन सुमारे ७२ लाख ६४ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात सोलापूर शहर सायबर पोलीसांनी आतापर्यंत एकूण चार आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये सूत्रधार आरोपी रोज मगर थापा (वय २३, पत्ता – बोसन, दक्षिणखली-१, काठमांडू, नेपाळ) तसेच त्याचा सहकारी दोरजे तमांग यांचा समावेश आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील काही रक्कम सारस्वत बँकेत असलेल्या एम इंजिनिअरिंग नावाच्या चालू खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासात पुढे असेही उघड झाले की, आरोपी रोज मगर थापा हा नेपाळचा नागरिक असून नेपाळमध्ये संपर्कात आलेल्या चिनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात येऊन आपल्या साथीदारांसह भारतीय नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवत त्यांच्या बँक खात्यांचा वापर करत असे. त्या खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे इतर खात्यांमध्ये वर्ग केली जात असे. आरोपी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व मणिपूर या राज्यांत राहून फसवणुकीचे जाळे चालवत होता.
तपासादरम्यान आरोपीच्या पासपोर्टची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध सन २०२५ मध्ये लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात असल्याने इमिग्रेशन विभागाशी समन्वय साधून त्याचा मागोवा घेण्यात आला. त्यानुसार दि. ८ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या इतर साथीदारांची माहिती मिळवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा तसेच पोसई प्रविण भोपळे, नागेश इंगळे, पोह/२०८ मच्छिंद्र राठोड, पोह/६०२ प्रकाश गायकवाड आणि पोको ६६५ रतिकांत राजमाने यांच्या पथकाने पार पाडली.
नागरिकांना आवाहन
सोलापूर शहर पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, काही व्यक्ती कमिशन किंवा जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना त्यांच्या नावाने बँक खाते उघडण्यास सांगतात. त्यासाठी पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिमकार्ड, ओटीपी यांसारखी माहिती मागितली जाते. अशा प्रकारची माहिती कोणालाही देऊ नये. अन्यथा आपल्या बँक खात्याचा वापर करून इतर राज्यांतील लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते आणि नकळत आपणही गुन्ह्यात आरोपी ठरू शकता.
सोशल मीडियावर जास्त नफा मिळवून देण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणातील आरोपी किंवा नमूद बँक खात्याबाबत कोणाकडे तक्रार अथवा माहिती असल्यास सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन सोलापूर शहर पोलीसांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment