सारा न्यूज नेटवर्क -
देगाव विभागात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यासाठी उपमहापौरांना निवेदन..
सोलापूर, दि. २६ नोव्हेंबर २०२६ :
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाल्याबद्दल एकात्मता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रथम महापालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले. मात्र देगाव विभागात अद्यापही ही सेवा पोहोचली नसल्याने, हा विभाग बस सेवेपासून वंचित राहिला आहे.
याबाबत संस्थापक अध्यक्ष आयु. सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
देगाव विभाग हा सोलापूर शहरातील अतिशय मोठा विभाग असून, या विभागात सुमारे दीड लाख लोकसंख्या राहते. या विभागात तिन्हे, देगाव, कोयना नगर, ५४ मीटर देशमुख पाटील वस्ती या चार मोठ्या गावांचा / वस्त्यांचा समावेश आहे.
सध्या या संपूर्ण विभागात महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी केवळ रिक्षावर अवलंबून रहावे लागत आहे. सध्या भाग दुष्काळग्रस्त परिस्थितीतून जात असून, शेती, मजुरीची कामे बंद आहेत. हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत रिक्षावाले प्रवाशांना अफाट भाडे आकारत असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहेत.
त्यामुळे देगाव विभागातील खालील मार्गावर तात्काळ इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रस्तावित मार्ग :
तिन्हे - देगाव - कोयना नगर - सी.एन.एस. हॉस्पिटल - ५४ मीटर देशमुख पाटील वस्ती - वाय चौक - मरीआई चौक - अवंती नगर - छ. संभाजी महाराज चौक - एस.टी. स्टँड - बाळीवेस - कोतम चौक
या मागणीमुळे देगाव विभागातील हजारो नागरिकांना स्वस्त, सोयीस्कर व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- संस्थापक अध्यक्ष : आयु. सचिन शिराळकर
एकात्मता बहुउद्देशीय संस्था, देगाव विभाग, सोलापूर


No comments:
Post a Comment