सारा न्यूज नेटवर्क -
साध्या वेशात आलेल्या DYSP च्या पथकाचा कंदलगावात छापा;
३,६०० माव्याच्या पुड्यांसह सव्वा लाखाचा गुटखा हस्तगत, दुकानदार अटकेत..
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
कंदलगाव येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व मावा यांचा विक्रीसाठी साठा केल्या प्रकरणी एका किराणा दुकान मालकास अटक करण्यात आली आहे. मंद्रुप पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख २८ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विश्वनाथ नागप्पा कोरे (वय ४५)राहणार कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) याच्या विरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंद्रूप पोलीस ठाण्याचे परिविक्षधीन डीवायएसपी गणेश शिंदे यांना कंदलगाव येथील एका दुकानात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजता साध्या वेशात डीवाएसपी शिंदे, पोलीस शिपाई अश्पाक मियावाले व त्यांची टीम कंदलगावात पोहचली. येथील समर्थ किराणा दुकान व समर्थ किराणा जनरल स्टोअरचे मालक विश्वनाथ कोरे यांच्या दुकानाची तपासणी केली. तेव्हा तेथे विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
यावेळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाल्याची पाकिटे, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, शट लक्झरी च्युइंग टोबॅको, गोवा १०००, एसपी ९९९ टोबॅको, केसरयुक्त हाय, आरएमडी पानमसाला आणि सुमारे ३,६०० माव्याच्या पुड्यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १,२८,९८६ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे रामानंद स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. मंद्रूपचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.




No comments:
Post a Comment