Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 10, 2023

सोलापूर महापालिकेत कायदा धाब्यावर बसवून बांधकाम परवाने देण्याचा गोरख धंदा; चार अधिकारी तडकाफडकी निलंबित

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर(प्रतिनिधी) : सोलापूर शहरात एकीकडे बेकायदा बांधकामांकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक चालविली असताना दुसरीकडे कायदा धाब्यावर बसवून भ्रष्ट मार्गाने बांधकाम परवाने देण्याची समांतर व्यवस्था महापालिकेत उजेडात आली आहे. अखेर पालिका प्रशासक शीतल उगले-तेली यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित चार अधिकारी व कर्मचा-यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे.

तथापि, कायदा धाब्यावर बसवून स्वतःच्या मर्जीने बांधकाम परवाने देण्याच्या समांतर व्यवस्थेशी संबंधित झालेली ही निलंबनाची कारवाई हे महापालिकेतील नगर रचना व   बांधकाम विभागातील भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचे हिमनगाचे टोक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नगर रचना व बांधकाम विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बढती मिळविणा-या संबंधित वरिष्ठ अधिका-यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

निलंबित झालेल्या अधिका-यांमध्ये सहायक अभियंता तथा महापालिका विभागीय कार्यालय क्र. ८ चे अधिकारी झेड. आर. नाईकवाडी यांच्यासह नगर रचना विभागातील अवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे, शिवशंकर बळवंत घाटे आणि वरिष्ठाश्रेणी लिपीक आनंद वसंत क्षीरसागर यांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक गंभीर तक्रारी असलेल्या सहायक अभियंता नाईकवाडी यांनी नगर रचना विभागात कार्यरत नसताना आणि बांधकाम परवानेविषयक प्रकरणे हाताळण्याचे कोणतेही अधिकार नसताना परस्पर आॕफ लाईन पध्दतीने बांधकाम परवाने दिले आहेत.


यापूर्वी नाईकवाडी हे नगर अभियंता विभागात कार्यरत असताना त्यांनी किती बांधकाम  परवाने स्वतःच्या मर्जीने दिली आणि बेकायदा बांधकामांविषयी प्राप्त तक्रारी किती प्रमाणात दाबून ठेवल्या , याची चौकशी झाल्यास आणखी गंभीर प्रकरणे उजेडात येतील, असे सांगितले जाते. तर अवेक्षक श्रीकांत खानापुरे व शिवशंकर घाटे यांनी नगर रचना विभागाला डावलून बेकायदेशीर आॕफ लाईन पध्दतीने बांधकाम परवाने देण्याची कृत्ये केली. वरिष्ठ लिपीक आनंद क्षीरसागर यांनीही बेकायदेशीरपणे आॕफ लाईन पध्दतीने बांधकाम परवाने देताना आणि मंजूर बांधकाम परवान्यांच्या प्रकरणाच्या मूळ नस्ती लेखा अभिलेख विभागात जमा करण्याची जबाबदारी जाणीवपूर्वक टाळली.

एवढेच नव्हे तर संबंधित प्रकरणांतील अभिलेखे परस्पर नष्ट करून नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवाने बेकायदेशीरपणे देण्याच्या गोरख धंद्यामध्ये सहभाग घेतल्याचे आढळून आले आहे. शहरात बेकायदेशीर बांधकामे वरचेवर वाढत असून यात विजापूर रस्त्यावरील एका टोलेजंग निवासी संकुलाचे प्रकरण अनेक दिवस चर्चेचा विषय बनला आहे. संबंधित निवासी संकुलास बांधकाम परवाना देताना तेथील विशिष्ट आकाराचा भूखंड महापालिकेला देण्याचे ठरले होते. परंतु महापालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे हितसंबंध जोपासल्याचा आरोप आहे. दुसरीकडे नव्या पेठेसारख्या वर्दळीच्या प्रसिध्द बाजार पेठेतसुध्दा राजरोसपणे बेकायदा बांधकामे होत असताना महापालिकेच्या नगर अभियंता तथा बांधकाम परवाना आणि नगर रचना विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचेही प्रकरण समोर आले आहे.


महापालिका प्रशासनाची खाबुगिरी असलेली अशी शेकडो प्रकरणे आहेत. अनेक व्यावसायिक संकुलांमध्ये तळमजल्यांतील वाहन तळाच्या जागा गायब झाल्या असून वाहन तळातच व्यावसायिक गाळे निर्माण झाले आहेत. वाहन तळाची सुविधा केवळ कागदावर दिसून येते. त्याकडे वारंवार लक्ष वेधूनसुध्दा महापालिका बांधकाम परवाना आणि नगर रचना विभागासह नगर अभियंता कार्यालयाकडून केवळ डोळेझाक केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत.


 सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment