सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर(प्रतिनिधी) :- मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला घराकडे आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मिळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.
घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते.
घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
घडलेली घटना खूपच वाईट आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही संकटावर उत्तर मिळू शकते. कुटुंबीयांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सहकारी मित्रांची चर्चा केली असती तर आज आनंद मळाळे यांच्यासोबत ही घटना घडली नसती. जीवनात प्रत्येक माणसाला कामाचा ताण, टेन्शन आहेच. प्रत्येकाने सकारात्मक राहून आयुष्य जगणे आवश्यक आहे.
- राजू मोरे,
सहाय्यक पोलीस आयुक्त
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment