Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, October 14, 2023

भारतीय संघाने जिंकला महासंग्राम….पाकिस्तानच्या पराभवाचा लाजिरवाणा विक्रम….

 



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर :- अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत आज भारतीय संघाने परंपरागत शत्रूत्वाचा इतिहास कायम राखत पाकिस्तानचा ७ विकेटसने (अवघ्या ३०.३ षटकात) अतिशय लाजिरवाणा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यन्त दोघांमध्ये झालेल्या ‘७’ सामन्यात पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नव्हता. आता त्यांच्या विक्रमी पराभवाचा हाच डोंगर आणखी एका संख्येने मोठा झाला आहे. या विजयानंतर भारतीय संघ गुणाच्या टेबलमध्ये पाहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.


पाकिस्तानच्या १९१ या अतिशय माफक धावसंख्येला उत्तर देण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. शुभमनने आल्या आल्या आपल्या बॅटचे पातेही उघडले होते. परंतु, तो जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही आणि १६ धावा करुन बाद झाला. आजच्या सामन्यात ईशान किशन ऐवजी डेंग्यूतून बरा होऊन आलेल्या आणि प्रचंड फार्मात असलेल्या शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली होती. 


शुभमनच्या जागेवर आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात एक चांगली पार्टनरशिप आकार घेवू लागली होती. परंतु, विराट (१६ धावा) खेळपट्टीवर फार काळ तग धरु शकला नाही. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्मा याने मात्र सामन्याची सगळी सूत्र हातात घेतली होती.शाहीन आफ्रीदी असेल, हसन अली असेल किंवा हरीस रऊफ आणि मोहम्मद नवाझ असेल, रोहितने कुणालाच दया माया दाखवली नाही. पाकिस्तानी गोलंदाजांना त्याने आज केवळ फोडूनच काढले नाही तर त्यांची सगळी लय बिघडवून टाकण्यात तो यशस्वी ठरला. 


अफगाणिस्तान विरुद्ध १३१ धावा आणि आज पाकिस्तान विरुद्ध ८६ धावा करून, आपणच विश्वचषक स्पर्धेचे हिटमॕन आहोत हे शाबीत केले. रोहितने आज ६ चौकार आणि ६ षटकार खेचले. त्यानंतर संघात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करुन भारतासाठी विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.


पाकिस्तानने विजयासाठी भारताला ५० षटकात आवघ्या १९२ धावा करण्याचे आव्हान दिले होते. पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ४२.५ षटकात संपला होता.  या डावाचे वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेवून सांघिक खेळाचा उत्कृष्ट नमुना पेश केला आहे.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment