Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, May 7, 2024

निवडणूक ड्राय डे कालावधीत 18 गुन्हे दाखल दोन लाख रुपये किमतीचा दारु साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी….

 


सारा न्यूज नेटवर्क - 

निवडणूक ड्राय डे कालावधीत 18 गुन्हे दाखल दोन लाख रुपये किमतीचा दारु साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी….

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्ह्यात 1918 लिटर दारू सह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.


 सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. ड्रायडे कालावधीत अवैध दारूची निर्मिती, विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत 1918 लिटर दारूसह एक वाहन असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.



या कारवाईदरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन मादगुंडी याच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू, आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून 1380 लिटर हातभट्टी दारू व लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून 75 लिटर ताडी जप्त करण्यात आली. तसेच अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील व दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्यासमवेत न्यू पाच्छापेठ येथील महादेव गुरुपादप्पा बुरकुले याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता 16 प्लास्टिक कॅरेट मध्ये साठवून ठेवलेल्या फ्रुट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या 384 बाटल्या जप्त करण्यात आल्या. दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी त्यांचे पथकासह हब्बू वस्ती देगाव नाका येथील गौतमी कोल्ड्रिंक्स हाऊस मध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल नागमोडे याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या व देशी दारूचे चाळीस बाटल्या जप्त केल्या. दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने न्यू पाच्छा पेठ येथे अशोक भालचंद्रसा हबीब याच्या ताब्यातून 25 लिटर व हणमंतू नारायण बोद्दुल यांच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून 146 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद व समाधान शेळके यांच्या पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका इसमास हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 ED8204 वरून कापडी पिशवीमध्ये मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या 15 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या दहा बाटल्या व नव्वद मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 30 बाटल्या वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी वाहन जागेवर सोडून फरार झाला. या कारवाईत वाहनाच्या किमतीसह 66,150 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याच पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात वीरास्वामी नागेश क्यामा याच्या ताब्यातून 30 लिटर व नरसव्वा लक्ष्मण बोडा याच्या ताब्यातून 80 लिटर ताडी जप्त केली. तसेच विडी घरकुल कुंभारी परिसरात छापा टाकून 400 लिटर ताडी जप्त केली. भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे व सुरेश झगडे यांच्या पथकाने जुना विडी घरकुल परिसरात राकेश शिवाजी पवार यांच्या ताब्यातून 400 लिटर व गांधीनगर येथील आकाश अप्पू जाधव याच्या ताब्यातून दीडशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने बापूजी नगर परिसरातील अंबादास शंकर चिल्लाळ याच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्रायडे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या विविध ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 192 बाटल्या व दोन लिटर क्षमतेच्या दोन बाटल्या असा एकूण 33920 रुपये किमतीचा दारु साठा जप्त केला. प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावामध्ये पद्माबाई बाळप्पा येड्डे हीच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 39, दिलीप मारुती लोहार याच्या ताब्यातून 44 व सुनील बाळू भोसले त्याच्या ताब्यातून 52 बाटल्या जप्त केल्या. निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने आष्टी ता. मोहोळ या ठिकाणी स्वप्निल लक्ष्मण व्यवहारे यांच्या ताब्यातून साडेसात लिटर विदेशी दारू साठा जप्त केला.


आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 423 गुन्ह्यात एक कोटी 39 लाख 58 हजार किमतीचा एक लाख 91 हजार 345 लिटर दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment