Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, August 12, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 


 ‘दीपज्योतीने उजळले ज्ञानमंदिर’;

 अंतर्मनातील प्रकाशाने अंध विद्यार्थ्यांनी प्रज्वलित केले दीप!

 चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत गतहारी अमावस्येनिमित्त भावपूर्ण दीपपूजन सोहळा !


सोलापूर : - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे गतहारी अमावस्येनिमित्त दीपपूजन सोहळा उत्साहपूर्ण आणि भावस्पर्शी वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे, दृष्टीची साथ नसलेल्या विद्यार्थ्यांनी श्रद्धेने दीपपूजन करून प्रकाशाचा हा उत्सव साजरा केला. डोळ्यांना दिसणारा प्रकाश नसला, तरी अंतर्मनात तेवत असलेल्या ज्ञानज्योतीच्या बळावर बाह्य जग उजळविण्याचा हा अनोखा सोहळा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.





              दीप हा केवळ अंधार दूर करणारा प्रकाशकण नसून तो ज्ञान, आशा, सकारात्मकता आणि संस्कारांचे प्रतीक आहे. याच भावनेतून विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलित करून ‘अंतरीची ज्योत तेवत ठेवली, तर जीवनाचा प्रत्येक मार्ग प्रकाशमान होतो’ असा प्रेरणादायी संदेश दिला.

              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार होत्या. प्रारंभी अर्चना यलगुलवार यांनी प्रास्ताविकातून दिनविशेषाचे महत्त्व स्पष्ट केले. दीपज्योतीच्या माध्यमातून जीवनातील आंतरिक व बाह्य अंधकार दूर करून ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक विचारांनी जीवन उजळून निघते, याचे त्यांनी सुंदर विवेचन केले.

                यावेळी प्रा. अर्चना अडसूळ यांनी गतहारी अमावस्येचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व विशद केले. परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालत दीपपूजनामागील सांस्कृतिक व सामाजिक आशय त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.


या प्रसंगी सांस्कृतिक प्रमुख प्रा. जोतिबा काटे, सुरेश बटगिरे, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. श्रावण इंगळे,अस्लम मुलाणी, पांडुरंग राऊत, तहसीन जामभाई, प्रा. मुमताज शेख, मानसी निलंगेकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अर्चना यलगुलवार यांनी केले. दीपपूजनाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून ‘दृष्टीपेक्षा दृष्टिकोन मोठा आणि बाह्य प्रकाशापेक्षा अंतर्मनातील प्रकाश श्रेष्ठ’ हा प्रेरणादायी संदेश सर्वांच्या मनावर उमटला.






No comments:

Post a Comment