सारा न्यूज नेटवर्क -
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा
वीरशैव लिंगायत महासभेच्या मेळाव्यात निर्णय, समाजाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद..
सोलापूर : - महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या मेळाव्यात नार्वेकर यांनी ही घोषणा केली. काशीपीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.
या निर्णयाची माहिती महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शनिवारी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. लवकरच हे तैलचित्र विधानसभेत लावले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
• वीरशैवरत्न पुरस्कार - केएलईचे कुलगुरू डॉ. प्रभाकर कोरे
• बसवरत्न पुरस्कार - अरविंद जत्ती
• वीरशैव भूषण पुरस्कार - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर
• पंचाचार्य पुरस्कार - बिदरचे माजी आमदार अशोक केणी
• विठ्ठल सेवा पुरस्कार - पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज
• अक्कम महादेवी रत्न पुरस्कार - कलबुर्गीच्या शरण बसवेश्वर विद्यावर्धक संघाच्या चेअरपर्सन डॉ. दाक्षायणी अव्वाजी
• वीरशैव आरोग्यदूत पुरस्कार - मंगेश चिवटे
तसेच महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंडरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment