सारा न्यूज नेटवर्क -
हातभट्टीची समस्या रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणार;
राज्य उत्पादन शुल्क नूतन अधिक्षक भाग्यश्री जाधव यांचा इशारा..
सोलापूर( प्रतिनिधी) :- सोलापूरला बदली झाल्यानंतर मी थोडी माहिती घेतली, तेव्हा हातभट्टी दारूची समस्या असल्याचे लक्षात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा यापासून जिल्ह्यातील अन्य ठिकाणी विशेष मोहीम राबविली जाईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, हातभट्टी दारू ही सातत्याने उद्भवणारी समस्या आहे. हातभट्टी निर्मिती, वाहतूक व तिची शहरासह ग्रामीण भागात होणाऱ्या विक्रीला आळा घालण्याची गरज आहे. आहे त्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त प्रभावी काम करण्यावर माझा भर असणार आहे.
शहरासह जिल्ह्यात आम्ही पथके तयार करणार आहोत. पथकांमार्फत थेट कारवाईची मोहीम राबवणार आहोत. कारवाई केली जाईल. शिवाय हा व्यवसाय करणाऱ्यांचे मनपरिवर्तन कसे करता येईल, याचा विचार करत आहोत.
एमपीडीए' सारख्या कारवायांचा प्रस्ताव
■ हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी आम्ही 'एमपीडीए' सारख्या कारवायांचा प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रस्ताव पाठवून त्यांच्यावर कारवाईचा पाठपुरावा होईल, असेही यावेळी भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.
हातभट्टी दारूव्यतिरिक्त शहरासह जिल्ह्यात जर देशी विदेशी दारूची विक्री होत असेल, तर अशा बेकायदा व्यवसायावरही कारवाया केल्या जातील. बीअर शॉपीचा परवाना असताना, त्याठिकाणी देशी- विदेशी दारू विक्री होत असेल, तर तेथेही धाडी टाकल्या जातील. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला बसून उघड्यावर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment