Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, November 11, 2024

शहर शांत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 शहर शांत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर

दोन पेक्षा अधिक गुन्हेगारांची यादी तयार ;

चौघांची पुणे येरवडा कारागृहात रवानगी

आजतागायत ५० गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

  सोलापूर(प्रतिनिधी) :- लोकसभेनंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशावरून दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. २० दिवसात चौघांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसांनी गुन्हेगारांची यादी तयार करून शहरातील अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार, एमपीडीए अन्वये कारवाई केली होती. यामुळे शहरातील गुंडांवर आळा बसला होता, आता त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा यादी तयार केली आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार हे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आदेश दिले आहेत. गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणे, दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार किंवा व्यक्तीवर तडीपार अथवा 'एमपीडीए' अन्वये कारवाई करून त्या गुन्हेगारांना पुणे येथील येरवडा कारागृहात पाठवण्याची कारवाई केली जात आहे.

■ पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये शेवटच्या आठवड्यात पदभार घेतल्यानंतर आतापर्यंत २१ गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

■ पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत ४६ जणांवर तडीपारची कारवाई केली होती. गेल्या दोन महिन्यांत हा आकडा ५० च्या पुढे गेला आहे. 


** निवडणुकीच्या काळात शांतता राहण्यासाठी व इतरवेळीही शहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता 'एमपीडीए सारख्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाया इथून पुढेही सुरूच राहणार आहेत. - एम. राज कुमार, पोलिस आयुक्त


**दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार झाली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने तडीपारची कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहर शांततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करीत आहोत - विजय कबाडे, पोलिस उपायुक्त


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment