Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 24, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा.!

  संगणक शिक्षण क्षेत्रात डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ पुरस्कार; 

जिल्हास्तरावर मिळविला प्रथम क्रमांक..


मंद्रूप (प्रतिनिधी) :दक्षिण सोलापूर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाच्या जोरावर मंद्रूप येथील डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटने संगणक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमएस-सीआयटी व टॅली या अभ्यासक्रमांसाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करून संस्थेने ग्रामीण भागातून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्या वतीने संस्थेला ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित एमकेसीएलच्या वार्षिक सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे व उपसंचालक अविनाश जवळकोटे यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.


यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी अतुल पतोडी, अमित रानडे, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, जिल्हा समन्वयक मीरा जेऊरकर, रोहित जेऊरकर, मलिक शेख, राहुल बारावकर, अलोक मालू, शिवानंद पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या सभेला सोलापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्रचालकांनी उपस्थिती लावली होती.




या सभेत अभिजीत जवळकोटे व अविनाश जवळकोटे यांनी मंद्रूपसह परिसरातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे एमकेसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.


आजच्या डिजिटल युगात संगणक ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, त्यांच्यात संगणक साक्षरता निर्माण व्हावी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट सातत्याने कार्यरत आहे. संस्थेमार्फत एमएस-सीआयटी, टॅली यांसह विविध संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे दर्जेदार शिक्षण दिले जाते.


विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि संचालकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे संस्थेने ३५० हून अधिक प्रवेशांची नोंद केली. ग्रामीण भागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याची ही कामगिरी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पावती मानली जात आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या या संस्थेचा झालेला गौरव म्हणजे केवळ संस्थेचा नव्हे, तर संपूर्ण मंद्रूप आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा सन्मान आहे. या यशाबद्दल संचालक अभिजीत जवळकोटे व उपसंचालक अविनाश जवळकोटे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




No comments:

Post a Comment