Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, October 20, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

दिवसाढवळ्या घरफोडीतील 02 सराईत चोरटे जेरबंद; 3,15, 200 रुपयांचा ऐवज जप्त

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.. 


सोलापूर (प्रतिनिधी ) :- नवरात्र उत्सव काळात दिवसा घरफोडी करून नागरिकांना लुटणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. सोलापूर शहरातील विजापूर रोड व विशाल नगर भागात घडलेल्या दोन घरफोडीच्या घटनांचा छडा लावून, पोलिसांनी आरोपींकडून सोनं, चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹३,१५,२००/- किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.


दोन ठिकाणी दिवसा घरफोडी

(अ) पहिली घटना – फिर्यादी सौ. रेखा कैलास चौधरी (वय ३८, रा. कोटणीस नगर, विजापूर रोड) या ओम डायग्नोस्टिक येथे काम करतात, तर त्यांचे पती जलसंपदा विभागात नोकरीस आहेत.


दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सर्वजण कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने (₹२,४७,००० किंमतीचे) चोरून नेले.


(ब) दुसरी घटना – विशाल नगर येथील सौ. पुनम सतिश वांगी (वय ४३) दुपारी २.३० वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर, त्यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला. ₹२२,००० रोख रक्कम, सोन्याची मंगळसूत्रे आणि चांदीचे आरती साहित्य असा सुमारे ₹१,१७,००० किंमतीचा ऐवज चोरला गेला.



  गुन्हे शाखेची प्रभावी चौकशी


या दोन्ही घरफोड्या नवरात्रकाळात झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळ तपासून सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यावरून गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाले.

  आरोपींची अटक आणि ऐवज हस्तगत

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय ३४, रा. चिंचवड, पुणे) हा पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याचे समजले.

दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी त्यास अटक करण्यात आली.

यानंतर दुसरा आरोपी राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३५, रा. वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) यास ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.

दोघांकडून चोरीतील ३ तोळे सोन्याचे दागिने, ६२ तोळे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹३,१५,२००/- किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

 कार्यवाहीत पुढाकार घेणारे अधिकारी


ही यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील,

सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संपूर्ण तपास पथकात स.पो.नि. शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी परिश्रम घेतले.

दिवसा लोकवस्तीतील घरफोडीचा हा गंभीर प्रकार अत्यल्प कालावधीत उघडकीस आणल्यामुळे, गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी या कार्याबद्दल पथकाचे अभिनंदन केले असून, अशा प्रकारच्या सतर्क आणि कौशल्यपूर्ण तपासाने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. 


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment