सारा न्यूज नेटवर्क -
वडाळा अपर तहसीलचा वाद पेटला; बळीरामकाका आणि सुभाष देशमुखांच्या गावाला विरोध का.?
वडाळा अपर तहसीलला मार्डीकर नेत्यांचा विरोध द्वेषातून? अठरा गावे वेठीस धरू नका..!
महापालिका हद्दीतील गावे वगळण्याच्या मागणीला वडाळा परिसरातील नागरिकांचा पाठिंबा
वडाळा (उत्तर सोलापूर): - शासनाने नुकतेच वडाळा येथे मंजूर केलेल्या अपर तहसील कार्यालयावरून आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मार्डी, वडाळा आणि शेळगी या तीन मंडळांचा समावेश असलेले हे अपर तहसील मार्डीला हलवावे, अशी मागणी मार्डी येथील काही नेत्यांकडून होत आहे. मात्र या मागणीला वडाळा परिसरातील १८ गावातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
वडाळाच सोयीचे, मार्डी गैरसोयीचे
नागरिकांच्या मते वडाळा हे प्रशासकीयदृष्ट्या सर्वात सोयीचे ठिकाण आहे.
हायवेवरचे गाव असल्याने दळणवळणाची चांगली सुविधा आहे. मोठी बाजारपेठ, शाळा-कॉलेज, ग्रामीण रुग्णालय या सर्व सुविधा वडाळा येथे आहेत. तसेच गाव सुसंस्कृत आणि शांत असल्याने अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण आहे.
याउलट ज्या मार्डी गावाची मागणी केली जात आहे, त्या गावाला जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, पुरेशी एसटी सेवा नाही. त्यामुळे मार्डीला कार्यालय झाल्यास सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
महापालिका हद्दीतील गावे वगळण्यास पाठिंबा
दरम्यान, सोलापूर महापालिका हद्दीतील गावे ही वडाळा अपर तहसील मधून वगळावीत, या मागणीला देखील वडाळा परिसरातील नागरिकांनी पाठिंबा असल्याचे सांगितले. महापालिकेची गावे वगळल्यास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील १८ गावांना या अपर तहसीलचा फायदा होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
द्वेषाच्या राजकारणाचा आरोप
वडाळा हे माजी आमदार बळीरामकाका साठे यांचे गाव आणि आमदार सुभाष देशमुख यांची जन्मभूमी आहे. त्यामुळेच राजकीय द्वेषातून आणि रागातूनच वडाळ्याला होणारे अपर तहसील मार्डीला नेण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत. हा प्रकार म्हणजे देशमुख आणि काका साठे यांच्यावरचा राग काढण्यासाठी १८ गावांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शासनाने सर्व बाबींचा विचार करून घेतलेला वडाळा अपर तहसीलचा निर्णय कायम ठेवावा आणि राजकीय दबावाला बळी पडू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments:
Post a Comment