Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, July 15, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

🌳 छोट्या पक्ष्यांना जीवदान; ऑपरेशन मोकळा श्वास....!!

 " वडाची झाडे दोऱ्यांच्या विळख्यातून मुक्त.."


बाळे (प्रतिनिधी) : वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून वडाच्या झाडाला गुंडाळण्यात आलेले दोरे आणि कापूस अनेक महिने झाडांवर तसेच राहिल्यामुळे पक्षी, वटवाघुळे तसेच इतर लहान जीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होत असल्याची बाब लक्षात घेऊन एकत्व सोशल फाउंडेशन, बाळेच्या सदस्यांनी ‘ऑपरेशन मोकळा श्वास’ ही पर्यावरणपूरक मोहीम राबवली. या उपक्रमांतर्गत बाळे व परिसरातील अनेक वडाची झाडे दोऱ्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यात आली.


वटपौर्णिमेनंतर झाडांवर राहिलेला दोरा व कापूस अनेक पक्षी घरटे बांधण्यासाठी किंवा अन्न समजून खातात, त्यामुळे ते त्यात अडकून जखमी होण्याच्या तसेच मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. याशिवाय झाडांवरील किडे, मुंग्या, सरडे, पाली आदींचा नैसर्गिक अधिवासही बाधित होतो. ही बाब लक्षात घेऊन एकत्वच्या सदस्यांनी धार्मिक भावना अबाधित ठेवत अत्यंत संवेदनशीलतेने झाडांवरील दोरे काढून त्यांना मुक्त केले.




यावेळी झाडांभोवती साचलेले निर्माल्यही गोळा करून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. तसेच झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. झाडांवर गुंडाळलेल्या कोरड्या दोऱ्यांमुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मोहीम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


या उपक्रमात प्रवीण गावडे, कुलदीप पवार, किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक करकी, पिरप्पा कोळी, राजेश वाघमोडे, शुभम जाधव, पारस करंडे यांच्यासह एकत्व सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


🔲वटपौर्णिमेनंतर वडाच्या अनेक झाडांभोवती गुंडाळलेला दोरा व कापूस काढून झाडाभोवती असलेल्या परिसर स्वच्छ करत, ऑपरेशन मोकळा श्वास ही मोहीम राबवण्यात आली, वडाच्या झाडांना गुंडाळलेल्या दोरांना आग लागण्याचे प्रकार घडतो, झाडांना इजा पोचतो, याची खबरदारी म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दोऱ्याच्या बंधनातील वडाचे झाड मुक्त करीत ही मोहीम राबविण्यात आले..

दीपक करकी - अध्यक्ष

एकत्व सोशल फाउंडेशन, बाळे. 





No comments:

Post a Comment