सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप ग्रामपंचायतीत सत्तांतराची चाहूल! उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर..
१४ सदस्यांचा ठरावाला पाठिंबा; सरपंचांसह चार सदस्यांचा विरोध – नव्या उपसरपंच निवडीकडे गावाचे लक्ष!
मंद्रूप (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर
मंद्रूप ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून, उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत मंजूर झाला. ४ विरुद्ध १४ अशा मतदानाने ठराव मंजूर झाल्याने उपसरपंचपदावरून राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच अनिता कोरे यांच्यासह सर्व १७ सदस्य उपस्थित होते. सभेदरम्यान अविश्वास ठरावाच्या बाजूने १४ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले, तर चार सदस्यांनी ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली.
ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये शकुंतला शिळ्ळे, शिवपुत्र जोडमोटे, सुनंदा मुगळे, शांताबाई चव्हाण, सुरेश मेंडगुदले, रेहाना शेख, शिवानंद लोभे, संजय कांबळे, सुरेश टेळे, पार्वती काळे, संगीता मेंडगुदले, यासीन मकानदार, चुंगाबाई ख्याडे आणि बेबी लिगेवान यांचा समावेश होता.
तर सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान व्हनमाने, सुधाकर कोरे आणि अंकिता कुंभार यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. अखेर ४ विरुद्ध १४ मतांनी ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण घाडगे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.
विशेष म्हणजे, मंद्रूप ग्रामपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी एकत्र येत उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे या मतदानाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. आता अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया कधी पार पडणार, तसेच नव्या उपसरपंचपदी कोणाचे नाव लागणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


No comments:
Post a Comment