Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, November 13, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; 

एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

डफरीन रुग्णालयात आरोग्य विभागाचे मोठे यश; मागील दीड महिन्यात तब्बल २०० प्रसूती

सोलापूर (प्रतिनिधी):

सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने वैद्यकीय सेवेत आज एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. शहरातील डफरीन (शासकीय) रुग्णालयावरील रुग्णांचा वाढता ताण लक्षात घेता, मनपा प्रसूतीगृहाने अत्यंत तत्परतेने पाऊल उचलत आज एकाच दिवसात सकाळी एक आणि रात्री आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत चार, अशा एकूण ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत.

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या कुशल आणि गतिमान मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. या सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी बल्ली, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश जोशी आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. चाफळकर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.


आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र परिश्रम:

या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील मेट्रन लेकुरवाळे, सीनियर सिस्टर ढगे, यासीन बागवान,दर्शन परब सौ. चलवादी, सौ. घोडके, सौ. व्यवहारे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी , तारा मावशी आणि लक्ष्मी मावशी, सुनीता मावशी, शबना यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

प्रसूतीगृहाचा वाढता आलेख:

सध्या डफरीन रुग्णालयातील कामाचा प्रचंड ताण आणि तेथील परिस्थिती पाहता, मनपाच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोठा आधार दिला आहे. या प्रसूतीगृहात मागील महिन्यात १५० प्रसूती यशस्वी झाल्या होत्या, तर चालू महिन्यात आतापर्यंत ५० प्रसूती पूर्ण झाल्या आहेत. अल्पावधीतच एकूण २०० प्रसूती आणि एकाच दिवशी ५ सिझेरियन शस्त्रक्रिया करून मनपा आरोग्य विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

सद्यस्थितीत डफरीन रुग्णालयात कामकाजाचा मोठा ताण असल्याने, गर्भवती मातांनी आणि नातेवाईकांनी कोणत्याही अडचणीशिवाय व तत्पर वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.





No comments:

Post a Comment