सारा न्यूज नेटवर्क -
अंधाराला अक्षरांचे तेज देणाऱ्या लुईस ब्रेल यांना चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे विनम्र अभिवादन..
सोलापूर :- स्पर्शाच्या बळावर अंधारात प्रकाशाची वाट दाखवणारे, दृष्टिहीनांच्या जीवनात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान विचारवंत लुईस ब्रेल यांना नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ शिक्षक श्री. सुरेश बटगेरी यांच्या शुभहस्ते लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. लुईस ब्रेल यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या जीवनकार्याचा जागर करण्यात आला. लहानपणी वडिलांच्या कार्यशाळेत खेळताना डोळ्याला झालेल्या अपघातामुळे ते पूर्णतः दृष्टिहीन झाले; मात्र या अंधाराने त्यांच्या जीवनातील प्रकाश विझवला नाही. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि ज्ञानाची आस बाळगून त्यांनी पॅरिस येथील रॉयल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड यूथ या संस्थेत शिक्षण घेतले.त्या काळातील दृष्टिहीनांसाठी उपलब्ध असलेल्या वाचनपद्धती अपुऱ्या व क्लिष्ट असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी १८२४ साली सहा उंचवट्यांच्या ठिपक्यांवर आधारित ब्रेल लिपी विकसित केली. या लिपीमुळे स्पर्शाच्या साहाय्याने वाचन-लेखन शक्य झाले आणि अंधांच्या शिक्षणविश्वाला नवी दिशा मिळाली. ब्रेल यांचे हे कार्य केवळ लिपी निर्माण करणारे नव्हे, तर दृष्टिहीनांच्या आत्मसन्मानाला व स्वावलंबनाला बळ देणारे ठरले.
यावेळी अंध विद्यार्थीनी रक्षता शिंदे व आदित्य शिंदे यांनी आपल्या मनोगतातून लुईस ब्रेल यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, “आम्ही अंध असलो तरी ब्रेल लिपीमुळे आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकलो आहोत,” असे भावनिक उद्गार काढले.एकात्म विभागाच्या दिव्यांनी साखरे मॅडम व सुरेखा कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी केले.
या प्रसंगी श्री. सुरेश बटगेरी,प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. अर्चना अडसूळ, प्रा. श्रावण इंगळे, श्री. मुकुंद शेटे, श्री. अस्लम मुलाणी, श्री. कासिम मुजावर, तहसीन जामभाई मॅडम, श्री. पांडुरंग राऊत, प्रा. मुमताज शेख यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम म्हणजे अंधारावर मात करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या लुईस ब्रेल यांच्या विचारांना दिलेले सच्चे व प्रेरणादायी अभिवादन ठरले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment