Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 12, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ॲड. राजशेखर शिवशरण अण्णा पाटील यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश.. 

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार – कार्यकर्त्यांसमोर भीष्म प्रतिज्ञा.. 

सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड. राजशेखर शिवशरण अण्णा पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

या प्रवेशावेळी बोलताना ॲड. राजशेखर पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“प्रभाग क्रमांक २४ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनुष्यबाण हे चिन्ह या प्रभागातून प्रचंड बहुमताने निवडून आणणारच — ही माझी भीष्म प्रतिज्ञा आहे.”

भाजपकडून लिंगायत समाजाची घोर उपेक्षा – समाजात तीव्र संताप

ॲड. राजशेखर पाटील हे स्वतः भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग २४ मधून सर्वसाधारण गटात इच्छुक उमेदवार होते. प्रभागात लिंगायत समाजाची मोठी संख्या असून, “लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे” अशी तीव्र व स्पष्ट जनभावना होती.

मात्र ही भावना पूर्णपणे डावलून भाजपाने ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला सर्वसाधारण गटात उमेदवारी दिली.

यामुळे लिंगायत समाजावर मोठा अन्याय झाला असून समाजातील प्रतिष्ठित, ज्येष्ठ व तरुण वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

आज या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण लिंगायत समाज एकवटला असून त्यांच्या भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा मोठा राजकीय उद्रेक येत्या काळात प्रभाग २४ मध्ये पाहायला मिळणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.

भाजपाने सुवर्णसंधी गमावली – बिराजदार यांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी हुकली

मागील दोन निवडणुकांमध्ये राजशेखर बिराजदार यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला होता. यावेळी लिंगायत समाजाची मजबूत साथ, अनुभवी नेतृत्व आणि संघटित कार्यकर्ते यांच्या जोरावर ती संधी भाजपाकडे चालून आली होती.

मात्र चुकीच्या उमेदवार निवडीमुळे भाजपाने ही सुवर्णसंधी स्वतःहून गमावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

शिंदे शिवसेनेला प्रभाग २४ मध्ये मोठे बळ

ॲड. राजशेखर पाटील यांच्या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला प्रभाग २४ मध्ये मोठे संघटनात्मक बळ मिळाले आहे. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, युवक आणि समाजातील प्रभावी घटक शिंदे शिवसेनेत दाखल झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग २४ मध्ये शिवसेनेची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, हा प्रवेश प्रभाग २४ च्या निवडणूक गणितात निर्णायक ठरणार असून, धनुष्यबाण पुन्हा एकदा या प्रभागावर आपला झेंडा रोवेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment