Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, October 13, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



पाच राज्यांतील शक्तीपीठांचा स्पर्श करत तामिळनाडूची अखंड ज्योत मंद्रूपमध्ये दाखल; ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी.! 


मंद्रूप (प्रतिनिधी) :दक्षिण सोलापूर

शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मंद्रूप येथे भक्ती आणि परंपरेचा एक अनोखा  जागर पाहायला मिळाला. मंद्रूपमधील जोडमोटे वस्तीतील 'श्री भ्रमरांबिका नवरात्र महोत्सव मंडळाच्या' १२० तरुणांनी तामिळनाडूतील कांचीपूरम येथून तब्बल १ हजार ७५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ दिवसांत पार पाडत अखंड ज्योत मंद्रूपमध्ये आणली. ऊन, वारा आणि पावसाची कोणतीही तमा न बाळगता, हातात धगधगती ज्योत घेऊन धावणाऱ्या या वीर तरुणांचे मंद्रूपमध्ये ग्रामस्थांनी आरती ओवाळून आणि फुलांचा वर्षाव करत हलगी व फटाक्याचा गजरात स्वागत केले. 



ग्रामीण भागात नवरात्रौत्सवात शक्तीदेवीच्या मंदिरातून अखंड ज्योत आणण्याची प्रथा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. मंद्रूपचे श्री भ्रमरांबिका मंडळ २०१८ पासून हा अनोखा उपक्रम राबवत आहे. यंदा या ज्योतीसाठी मंडळाचे १२० तरुण ४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूकडे रवाना झाले होते. ६ ऑक्टोबर रोजी कांचीपूरमच्या प्रसिद्ध कांची कामाक्षी मंदिरातून ही ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

५ राज्यांतील शक्तीपीठांना स्पर्श करत प्रवास

तामिळनाडूतून निघालेली ही अखंड ज्योत केवळ रस्ता पार करत आली नाही, तर तिने भारतातील विविध संस्कृतींना जोडण्याचे काम केले. 



हा प्रवास करताना तरुणांनी तिरुपती (पद्मावती माता), श्रीशैलम (भ्रमरांबिका माता), आलमपूर (जोगुलांबा माता) आणि कर्नाटकातील घत्तर्गी (भागम्मा माता) अशा पाच राज्यांतील पवित्र शक्तिपीठांना स्पर्श केला आणि रविवारी ही ज्योत मंद्रूपमध्ये दाखल झाली.


एकजूट आणि भक्तीची ताकद

महामार्गावरून धावताना स्वतःची सुरक्षा जपत, आळीपाळीने अखंड ज्योत हातात धरून धावणाऱ्या या युवकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि भक्तीची शक्ती पाहायला मिळत होती. या ऐतिहासिक दौऱ्याचे नियोजन व नेतृत्व नीलेश जोडमोटे, रेवणसिद्ध जोडमोटे, शिवपुत्र जोडमोटे यांच्यासह मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केले. यापूर्वी या मंडळाने महाराष्ट्रातील तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, वणी या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांसह म्हैसूर, श्रृंगेरी, होरनाडू, कोल्लूर आणि बदामी अशा दक्षिण भारतातील विविध तीर्थक्षेत्रांतूनही ज्योत आणण्याचा आपला संकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.


ज्योत गावात येताच मंद्रूपकरांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात  तरुणांच्या या अद्भूत साहसाचे आणि श्रद्धेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.




No comments:

Post a Comment