सारा न्यूज नेटवर्क -
गणेश विसर्जन मिरवणुकीत पैसे आणि मोबाईल हरवले ;
पोलीसांनी शोधून दिले, रडणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर आले हसू..
सोलापूर(प्रतिनिधी):- विजापूर रोडवरील विजापूर नाका मध्यवर्ती गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिलेचे हरवलेले पाकीट पोलिसांना सापडले. पाकीट पुन्हा मिळाल्याने रडणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सपना विनोद कसबे (वय २८, रा. चाँदतारा मशिदीजवळ, सोलापूर) या सायंकाळी आपल्या कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या. त्या विजापूर रोडवरील मिरवणूक पाहत- पाहत जात असताना, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हातातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व पाच हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट पडले. सपना कसबे या तशाच पुढे निघून गेल्या. दरम्यान, कर्तव्यावर असलेले हवालदार सनी वाघमारे व साजीद शेख हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यांना पाकीट आढळून आले. त्यांनी त्यातील मोबाइल व इतर कागदपत्रे पाहिली.सपना कसबे यांच्या दुसऱ्या मोबाइलवर संपर्क साधून आयटीआय चौकी येथे बोलावून घेतले. ओळख पटवून त्यांचा मोबाइल व त्यातील रोख रक्कम असलेले पाकीट दिले. पाकीट हरवल्याने सपना कसबे यांच्या डोळ्यांत पाणी आले होते.
दोन्ही पोलिसांच्या प्रामाणिकपणाबद्दल सहायक पोलिस आयुक्त राजन माने, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विष्णु गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment