Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 21, 2025

महमंदवाडीतील बीबीसी रुफटॉप हॉटेलवर हुक्का पार्लरवर छापा; ५७ तरुण-तरुणींचा सहभाग, ८२ हजारांचा माल जप्त,८ जणांना अटक..


 सारा न्यूज नेटवर्क - 

महमंदवाडीतील बीबीसी रुफटॉप हॉटेलवर हुक्का पार्लरवर छापा; 

५७ तरुण-तरुणींचा सहभाग, ८२ हजारांचा माल जप्त,८ जणांना अटक.. 


पुणे (प्रतिनिधी) : - शहरातील विविध ठिकाणी हुक्का बारवर बंदी असतानाही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स लपूनछपून या व्यवसायास खतपाणी घालत असल्याचे उघड झाले आहे. मोहम्मदवाडी परिसरातील रहेजा व्हिस्टा सेंटरमधील ‘बीबीसी रूफटॉप किचन अँड बार’ या हॉटेलवर गुन्हे शाखेच्या युनिट ५ व काळेपडळ पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून हुक्का पार्लरचा भांडाफोड केला. या कारवाईत ५७ तरुण-तरुणी हुक्क्याचा आनंद घेताना आढळले असून, पोलिसांनी हॉटेल मालकासह ८ जणांना अटक केली आहे. तसेच ८२ हजार ९९ रुपयांचा हुक्का संबंधित माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७ मे) रात्री पावणे बारा वाजता करण्यात आली. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमित कांबळे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. छाप्यावेळी ‘बीबीसी रुफटॉप किचन अँड बार’ हॉटेलच्या टेरेसवर एका मोठ्या ओपन हॉलमध्ये तब्बल १६ टेबल्सवर ५७ तरुण-तरुणी हुक्का ओढताना दिसून आले. या तरुणाईमध्ये लोहगाव, मुकुंदनगर, वानवडी, गुलटेकडी, तळेगाव दाभाडे, एनआयबीएम रोड, भवानी पेठ, सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड, धनकवडी, बिबवेवाडी, वडाची वाडी, सदाशिव पेठ आदी भागातील नागरिकांचा समावेश होता. पोलिसांनी सर्वांचे नाव, पत्ता टिपून घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत मालक पार्थ अनिल वाल्हेकर (वय ३३, रा. कुमार सिनीन, सहकारनगर), मॅनेजर दीपक अवतार सिंग (वय ३४, रा. मनिष प्लाझा, मोहम्मदवाडी), आणि कर्मचारी अहमद रजा खान (वय ३०), अजय रामसिंग जनाला (वय २०), करणसिंग डमरसिंग थापा (वय २७), शितल गंगाराम बोहरा (वय २७), केशव दीपक चौलागाई (वय २१), दीपक प्रेमबहाद्दुर सिंग (वय ३६) यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. छाप्यात २७ काचेचे हुक्का पॉट्स, ३२ मातीचे चिलीम, ३२ पाईप, विविध फ्लेवर्सचे तंबाखुजन्य डब्बे, लाकडी कोळसा यांचा समावेश असलेला ८२ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. सध्या सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार शुभांगी माळसेकर, ऋषिकेश ताकवणे, अकबर शेख तसेच काळेपडळ पोलिस ठाण्याचे एपीआय प्रविण अब्दागिरे, पोलीस अंमलदार नितीन शिंदे, महादेव शिंदे, अश्विनी तिडके, पंधरकर, भुजबळ, काळे, ठोंबरे आदींनी केली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment