Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 19, 2023

लक्षद्वीप रेकाॕर्ङब्रेक. :पाळण्याच्या कार्यक्रमास महिला भगिनी व शिवभक्तांची तुफान गर्दी....! सोलापुरात अवतरला जणू शिवकाळ.!!

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर(प्रतिनिधी) :  "झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा….!
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे.... झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा ..!" या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले.. वीरमाता, वीरपत्नी, वीरकन्यांच्या विशेष उपस्थितीत आयोजिलेला श्री शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार "पाळणा" सोहळा
 "याची देही याची डोळा" सोलापूर नगरीत हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पाहिला. यानिमित्ताने सोलापुरात  जणू शिवकाळ अवतरला असल्याचे प्रेरणादायी चित्र पहायला मिळाले. या पाळणा गीताने हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मनोभावे मानवंदना दिली.

 
      19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा शिवजन्मोत्सव सोहळा सोलापुरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरात मध्यरात्री  छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शानदार सोहळ्याचे श्री  शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते. 
 
        सोलापूर शहरात शनिवारी दि.18 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची गर्दी जमत असल्याचे पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्यास शिवनेरी किल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रुप देण्यात आले होते. एकूणच या परिसरात जणू शिवकाळ अवतरला असल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण पुतळ्याच्या परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि या पुतळ्याच्या समोरच पाळणा सजवण्यात आला होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती. 
 
 महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते आरती
मध्यरात्री 11.50 वाजता  सुरुवात झाली. सोलापूर शहर- जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरकन्या यांच्या हस्ते पाळणा झुलवून या सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली. महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो महिलांनी एकमुखाने मंगल स्वरात "पाळणा गीत" गायले..... 
"झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…....
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…...
ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा…..!"  
 या स्फूर्तीदायी आणि ऊर्जादायी पाळणा गीताने उपस्थित हजारो शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. 
      गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, फटाक्यांची मनोहारी, नयनरम्य आतषबाजीने आकाश प्रकाशित झाले होते. यावेळी एकमेकांना मिठाई देऊन श्री शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.    
       श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक , ऊर्जादायी असा सोहळा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो माता - भगिनींसह शिवभक्तांनी विराट गर्दी केली होती. लॉकडाऊननंतर सोलापुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचा भव्यदिव्य दिमाखदार असा सोहळा पार पडला. जोशपूर्ण व खुमासदार शैलीत प्रा. ज्योती वाघमारे यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
     जनसागर या सोहळ्यासाठी लोटला होता. हाती भगवा झेंडा घेऊन शिवप्रेमी सहभागी झाले होते. "तुमचं आमचं नातं काय - जय जिजाऊ ,जय शिवराय", "शिवाजी महाराज की जय" यासह विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. बाल मावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत तलवारबाजीसह मर्दानी खेळ सादर केले. सर्व जाती-धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले.
      दोन वर्षांच्या खंडानंतर अशाप्रकारचा सोहळा पार पडत असल्याने सर्वच समाजातील आबालवृद्ध शिवप्रेमी यावेळी हजारो संख्येने उपस्थित होते. शानदार असा सोहळा असंख्य शिवप्रेमींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
 यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
      यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, सल्लागार पुरुषोत्तम बरडे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मतीन बागवान , श्रीकांत घाडगे, मनीष काळजे, माऊली पवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, राजन जाधव, श्रीकांत डांगे, भाऊ रोडगे यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment