१२ फेब्रुवारी २०२३
सोलापूर(प्रतिनिधी) : पक्षीमित्रांच्या मनावर अधीराज्य गाजवणाऱ्या पण नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याला वाचविण्यासाठी पुणे वन विभागाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी राज्यातील पहिले ‘माळढोक संवर्धनात्मक प्रजनन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे माळढोकचे माहेरघर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्यातील पन्नास एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.
या संदर्भातील प्रस्तावाचे काम सुरू असून, लवकरच तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल; तसेच राजस्थान सरकारकडे माळढोक पक्ष्याची अंडी आणि एक नर-मादीची जोडी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. नान्नज अभयारण्य खास माळढोक पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत माळढोकची संख्या झपाट्याने कमी होऊन सध्या तेथे केवळ एकच पक्षी वास्तव्यास आहे.
माळढोकचे अस्तित्व असलेल्या सर्वच राज्यांमध्ये ही परिस्थिती असून, यावर पक्ष्याचे अस्तित्व राखण्यासाठी केंद्रीय वन्यजीव संवर्धन संस्थेने ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्पाचा पर्याय दिला आहे. या पूर्वी गिधाडांच्या संवर्धनांसाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाने हा मार्ग स्वीकारला होता.
अलीकडेच माळढोकसाठी राजस्थानमध्ये जैसलमेर येथे पहिला ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. देशातील दुसरा प्रकल्प आता सोलापूरमध्ये सुरू होत आहे.
● राज्यातील पहिलाच प्रकल्प :
या संदर्भात पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण म्हणाले, ‘नान्नज माळढोक अभयारण्याचा समावेश पुणे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात होतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही जागेची पाहणी केली आहे. प्रकल्पासाठी ५० एकर जागा निश्चित केली आहे. प्रकल्पासाठी मोठे क्षेत्र आवश्यक असते. यामध्ये वैद्यकीय, संशोधन देखरेखीखालील क्षेत्र आणि पक्ष्याला मुक्तपणे वावरता येईल असा नैसर्गिक; पण बंदिस्त अधिवास राखीव ठेवला जातो.
संशोधन विभागात इनक्युटेबर, हॅचर, पिल्लांच्या संगोपनासाठी वेगवेगळे कक्ष असतात. यात पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पूर्णवेळ कार्यरत असते.’ ‘सध्या जैसलमेर येथे याच प्रकारचा प्रकल्प कार्यरत असून, याच धर्तीवर राज्यातील पहिला प्रकल्प लवकरच साकारणार आहे. प्रस्तावाचे काम सुरू असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. राजस्थान सरकारने प्रकल्पासाठी माळढोक पक्ष्याची अंडी आणि एक जोडी द्यावी अशी मागणीही करणार आहोत,’ असेही चव्हाण यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment