Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 13, 2023

सोलापुरातील सिग्नलवर आता ‘NPR’ कॅमेरे! नियम मोडल्यास दंड घरपोच; आणि दंड न भरल्यास वाहन जप्त


 सोलापूर : शहरातील वाहतुकीला स्वयंशिस्त लागावी, अपघातांची संख्या कमी व्हावी आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी आता सोलापुरातील सिग्नलवर ‘एनपीआर’ (नंबरप्लेट रिडर) कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियम मोडल्यास आपोआप संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत असून वाहनांची संख्या दरमहा दीड हजारांच्या पटीत वाढू लागली आहे. दुसरीकडे अपघातांची संख्या वाढत असून जड वाहनांच्या बंदीचा कालावधी वाढवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहनधारकांना स्वयंशिस्त लावावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांशिवाय बेशिस्तांवर कारवाई करणे शक्य होण्यासाठी ‘एनपीआर’ सिस्टीम खूप फायद्याची ठरणार आहे.पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये ‘एनपीआर’ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सिग्नल जंम्पिंग किंवा सिग्नल तोडल्यास, अतिवेगाने जाणारी वाहने त्या कॅमेऱ्यात टिपली जातील. त्या वाहनधारकांना फोटोसह दंड त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल. फॅन्सी नंबरप्लेट, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहतूक, सिग्नल तोडणाऱ्यांवर आता ‘एनपीआर’ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ऑनलाइन दंड होत असल्याने देखील काही वाहनधारक निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूक नियम मोडलेल्या वाहनधारकाने वेळेत दंड न भरल्यास यापुढे त्यांची गाडी पोलिसांत जमा करून ठेवली जाणार आहे.

शहर सिग्नलवर एनपीआर कॅमेरे अन् चौकाचौकात सीसीटीव्हीशहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना स्वयंशिस्त जरुरी आहे. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच बेशिस्तांवर कारवाई शक्य होत नाही. दुसरीकडे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणून गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा होईल, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खूप मोठी गरज आहे.त्यादृष्टीने आता स्मार्ट सिटीतून १३० चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्री विखे पाटील यांनीही जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे लवकरच शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नलवर एनपीआर कॅमेरे लागतील, असा विश्वास पोलिस आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. शहर पोलिसांनी तगडे नियोजन केले आहे, पण आता स्मार्ट सिटी व जिल्हा नियोजन समितीकडून कधीपर्यंत कार्यवाही होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनपीआर कॅमेऱ्यांचे सुरु आहे नियोजन शहरातील छोट्या-मोठ्या एकूण १३० चौकांमध्ये स्मार्ट सिटीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. तर आणखी पाच कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मिळणार आहे. त्यातून बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईच्या दृष्टीने ‘एनपीआर’ कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.- 

अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर


No comments:

Post a Comment