Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, July 28, 2024

नऊ मोटरसायकलींसह एक लाखाची दारू जप्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त.



 सारा न्यूज नेटवर्क - 

नऊ मोटरसायकलींसह एक लाखाची दारू जप्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील दोन दिवसात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत 9 मोटरसायकलींसह एक लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस  रुपये किंमतीची देशी-विदेशी व हातभट्टी दारू जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व देशी-विदेशी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मोहिम राबविण्यात येत असून शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत नोंदविलेल्या नऊ गुन्ह्यात 9 मोटरसायकलींसह 18 लिटर देशी दारू, 22 लिटर विदेशी दारू व 780 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांच्या पथकाने मोहोळ शहरात अतुल महादेव जाधव , वय 40 वर्षे, राहणार टाकळी सिकंदर याला त्याच्या बजाज पल्सर क्रमांक MH13 CF3496 वरून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 65 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले. तसेच नारायण चिंचोली ता. पंढरपूर येथून अजित नागनाथ वनसाळे, वय 26 वर्षे, रा. तुंगत याला देशी दारू शिकारी संत्रा ब्रॅंडच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर क्रमांक MH13 EG 6247 जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच निरीक्षक माळशिरस सचिन  भवड यांच्या पथकाने मंगळवेढा- पाटकळ रोडवर समर्थ सुनील कट्टे, वय 20 वर्षे या इसमाला देशी दारूच्या 48 बाटल्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 DS 0424 या मोटरसायकली वरून वाहतूक करताना पकडले.  


शनिवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर-हैदराबाद रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून शंकर सत्यप्पा वाळी, वय 42 वर्षे याला बजाज प्लेटिना MH13 AL 1302 वरून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटरची दारू वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून पन्नास हजार पाचशे रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह नव्वद हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील इटकी गावाचे हद्दीत धनाजी शामराव बुधावले, वय 39 वर्षे या इसमाला हिरो होंडा स्प्लेंडर MH03 Y4433 वरून चाळीस लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना पकडले. पंढरपूरच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांचे पथकाने शनिवारी नऊ वाजेच्या सुमारास पिंटू भिलू वडजे, वय 43 वर्षे याला नरखेड ता. मोहोळ येथे रबरी ट्यूब मधून 80 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH13 CV 3398 सह गुन्हा नोंदवला. तसेच याच पथकाने मोहोळ कुरुल रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून धनाजी दत्तात्रय काळे, वय 40 वर्षे या इसमास ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 55 बाटल्यांची वाहतूक करताना होंडा यूनिकॉर्न MH13 EM 0510 या वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून सात हजार चारशे पंचवीस रुपये किमतीच्या विदेशी दारूसह 97 हजार 525 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी फोंडशिरस येथून अंकुश दत्तू चव्हाण, वय 50 वर्षे याला बजाज पल्सर MH 04 ER 5913 वरून 60 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात भरारी  पथकाने एका मोटरसायकलीवरून शंभर लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा दाखल केला असून आरोपी वाहन जागीच सोडून फरार झाला असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. 

या संपूर्ण मोहिमेत एक लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये किंमतीची दारु व नऊ मोटरसायकली असा सहा लाख पासष्ट हजार पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, पंकज कुंभार, सचिन भवड,दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, श्रद्धा गडदे, सुरेश झगडे, बाळू नेवसे, सौरभ भोसले, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, जीवन मुंढे, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, किरण खंदारे, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, तानाजी काळे, तानाजी जाधव, गजानन जाधव, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे व वाहनचालक रामचंद्र मदने, मारुती जडगे, दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.


नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या परिसरातील हातभट्टी दारू, अवैध देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादीविरुद्ध तक्रार असल्यास या विभागाला संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment