Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, October 16, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 आरोग्य केंद्रात मावा बनविण्याच्या अड्ड्यावर आयुक्त डॉ. ओंबासेंची ‘मुंडे स्टाईल’ धाड!

आरोग्य केंद्राच्या पाहणीसाठी गेले अन् मावा कारखान्याचा पर्दाफाश झाला.. 


सोलापूर : - आरोग्य केंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी चक्क आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरू असलेला मावा बनविण्याचा कारखाना शोधून काढला! अनधिकृत कारखाना नजरेस पडताच आयुक्तांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन करून कारवाईचे आदेश दिले. तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीची आठवण करून देणाऱ्या या कारवाईमुळे अनधिकृतांचे धाबे दणाणले आहेत.


प्रभाग क्रमांक ०८ मधील नगरसेवकांच्या विनंतीवरून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी साखर पेठ येथील कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी आरोग्य केंद्राला भेट देऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील आवश्यक दुरुस्ती, वैद्यकीय सुविधा आणि अपुऱ्या मनुष्यबळाबाबत आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.



सदर आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जुनी व जीर्ण झाली असून, यापूर्वी रुग्णांची तपासणी सुरू असतानाच स्लॅबचे काँक्रीट ढासळल्याची गंभीर घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी इमारतीची बारकाईने पाहणी केली.


आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण जागेचा अधिक चांगला उपयोग नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी कसा करता येईल, याबाबत आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार विजय देशमुख यांच्या पुढाकारातून शेळगी येथे उभारण्यात आलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (UPHC) धर्तीवर साखर पेठ येथेही सुसज्ज आरोग्य केंद्र उभारता येऊ शकते, अशी बाब समोर आली. त्यानुसार नवीन UPHC उभारणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी डॉ. राखी माने यांना दिल्या.



मागील बाजूस पाहणी अन् आयुक्तांसमोर धक्कादायक प्रकार!


आरोग्य केंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेची पाहणी करण्यासाठी आयुक्त गेले असता तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. एका ठिकाणी नवीन सायकल फिटिंगचा कारखाना सुरू असल्याचे दिसले. त्याच परिसरात जाळीच्या गेटमधून पाहणी केली असता चक्क मावा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले!


हा प्रकार पाहताच आयुक्त डॉ. ओंबासे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपायुक्त प्रीतम यालावलकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित प्रकाराची माहिती दिली आणि तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.


आयुक्तांच्या सूचनेनंतर पोलीस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. संबंधित ठिकाणाची पाहणी करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.


दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अविनाश वाघमारे यांच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी करून अतिक्रमणधारकांवर कारवाई तसेच साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली.


जिथे आरोग्य जपायचे, तिथेच आरोग्याशी खेळ!


नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या परिसरातच मावा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे जीर्ण इमारतीतून नागरिकांना आरोग्यसेवा दिली जात असताना दुसरीकडे आरोग्य केंद्राच्या जागेवर अनधिकृत असे उद्योग सुरू असल्याचे पाहणीत उघड झाले.


आरोग्य केंद्राच्या पाहणीसाठी आलेले आयुक्त थेट कारवाईच्या भूमिकेत शिरल्याने ‘मुंडे स्टाईल’ प्रशासनाचा प्रत्यय सोलापूरकरांना आला. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



या पाहणी दौऱ्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता सलमान मणियार, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आरोग्य केंद्राच्या विकासासाठी गेले अन् अनधिकृत बंदी असलेल्या मावा कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला! आयुक्त डॉ. ओंबासेंच्या या अनपेक्षित धडक कारवाईची शहरात चर्चा रंगली आहे.




No comments:

Post a Comment