Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, October 17, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



'नशामुक्त भारत' मोहिमेला यश..! 

आलिशान कारमधून गांजाची वाहतूक, १५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : आरोपीस पोलीस कोठडी


सोलापूर (प्रतिनिधी) : - केंद्र सरकारच्या 'नशामुक्त भारत' मोहिमेअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ कारवाई करत १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार असा एकूण १५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस अंमलदार मनोज राठोड यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती की, ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर ते मिरजकडे जाणाऱ्या महामार्गावर MH 10 DQ 8897 या कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत आहे. 


सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिली. माहिती मिळताच कामती ते बेगमपूर मार्गावर इंचगाव टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचला. संशयित कार येताच पोलिसांनी तिला थांबवून चालकास ताब्यात घेतले. झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.




या प्रकरणी शुभम लालासाहेब काळे (वय २८, मूळ रा. हरंगुळ रेल्वेजवळ, बार्शी रोड, एमआयडीसी, लातूर, सध्या रा. आंबेडकरनगर, अरली कॉर्नर, जत, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये (गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायालय, मोहोळ यांनी त्याला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गांजा आरोपीने कोठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि विजय शिंदे, दशरथ गोरे, अविनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे, अन्वर आतार, मनोज राठोड, प्रमोद गायकवाड, राहुल दोरकर तसेच कामती पोलीस ठाण्याचे अस्मान शेख, काळजे यांच्या पथकाने केली आहे.




No comments:

Post a Comment