सारा न्यूज नेटवर्क
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय समितीवर निवड
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले पत्र : निवडीनंतरच्या पहिल्याच अधिवेशनानंतर मिळाली मोठी संधी
सोलापूर (प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच संसदीय अधिवेशनानंतर खा. डॉ. ज्योती वाघमारे यांना मिळालेली ही मोठी संधी आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे या नियुक्तीची घोषणा केली आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीचे अधिकृत पत्र शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते खा. डॉ. वाघमारे यांनी स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांचे विशेष कौतुक केले. आणि महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली होती. याचीच दखल घेत मोदी सरकारने त्यांची महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. देशातील महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि बालकांचा विकास या विषयांवर ही समिती धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते. या नियुक्तीबद्दल डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment