सारा न्यूज नेटवर्क -
जिद्द, चिकाटी अन् देशभक्तीचा जागर;
नॅब च्या विद्यार्थ्यांनी रंगविला स्वातंत्र्यदिन...
सोलापूर :- नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सोलापूर संचलित राजीव गांधी मेमोरिअल स्कूल फॉर द ब्लाइंड, ममता मूकबधिर विद्यालय, चंद्रभागाबाई यलगुलवर शिशु व प्राथमिक शाळा तसेच चंद्रभागाबाई यलगुलवर प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य सीमा यलगुलवार यांनी आपल्या प्रास्ताविकात 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या महात्म्या बद्दल माहिती दिली. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्था उपेक्षितांसाठी करत असलेल्या कामांचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रास्ताविकात केला त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब च्या उपाध्यक्षा श्रीमती अनुगीता पवार होत्या. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कुमारी गंगा कदम यांची प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती लाभली. यावेळी नॅब सोलापूरचे सेक्रेटरी श्री.शशिभूषण यलगुलवर, प्राचार्या सौ. सीमा यलगुलवार,खजिनदार श्री. चंद्रकांत कुलकर्णी,आजीव सभासद श्री. सुधाकर वल्लाकाटी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.संतोष माशाळे सर, ममता मूकबधिर विद्यालयाच्या सौ. गायकवाड मॅडम तसेच पर्यवेक्षक श्री. बंडोपंत पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण आणि थरारक मानवी मनोरे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दृष्टीबाधित व मूकबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना दिलेल्या सर्जनशील अभिव्यक्तीने संपूर्ण प्रांगण देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले.
प्रमुख पाहुण्या कुमारी गंगा कदम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली. क्रीडा क्षेत्रात ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास कोणतेही आव्हान अशक्य नसल्याचा संदेश त्यांनी दिला.अध्यक्षीय भाषणातून श्रीमती अनुगीता पवार यांनी विद्यार्थ्यांच्या विविधांगी कौशल्यांचे कौतुक करत त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन दिले.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत परिसर हिरवागार ठेवण्याचा संदेश देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड चे अधीक्षक सौरभ शिंगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानत,उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.


No comments:
Post a Comment